नवी दिल्ली – चीनच्या सत्ताधारी साम्यवादी पक्षाचे म्हणजे सीसीपीचे २० वे पंचवार्षिक अधिुवेशन रविवारी बीजिंगमध्ये सुरू झाले. हे अधिवेशन २२ ऑक्टोबरपर्यंत चालले. सीसीपीच्या बैठकीनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा कार्यकाळ वाढवला जाण्याची शक्यता आहे. याविरोधात ब्रिटनमधील मँचेस्टर येथील चिनी वाणिज्य दूतावासाबाहेर निदर्शने झाले. यावेळी वाणिज्य दूतावासाच्या कर्मचाऱ्यांनी एका आंदोलकाला कार्यालयाच्या आवारात ओढले आणि बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आंदोलकाने सांगितले की, आम्ही निदर्शने करत होतो. त्यानंतर वाणिज्य दूतावासाच्या लोकांनी मला आत ओढले. मी पळून जाण्यापूर्वीच त्यांनी मला घेरले आणि मारहाण केली. त्यांनी असे करायला नको होते. कारण ब्रिटनमध्ये आम्हाला आवाज उठवण्याचे स्वातंत्र्य आहे. यावर वाणिज्य दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आंदोलक चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा अपमानास्पद फोटो घेऊन घोषणाबाजी करत होते. मँचेस्टर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गेल्या पाच वर्षांचा कार्य अहवाल आणि पुढील पाच वर्षांसाठी धोरणात्मक दिशा सादर करत अधिवेशनाची सुरवात केली. जिनपिंग अधिवेशनात म्हणाले की, सरकारने सेना आणि जनता जोडली आहे. विकासाची नवीन उद्दिष्टे निश्चित केली आहेत. अनेक धोरणात्मक बदल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. तसेच झिरो-कोविड धोरणामुळे लोकांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था वाचली आहे. त्याचे परिणाम चांगले झाले आहेत.