सौजन्य - सोशल मिडीया
पुणेे : अधुन मधुन पडणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी… आकर्षक सजावट केलेल्या हंड्या… उडत्या चालीवरील गाण्यांवर धरलेला ठेका… मानवी मनाेरे रचताना निर्माण झालेली उत्सुकता… अशा जल्लाेषाच्या वातावरणात दहीहंडीचा उत्सव शहरात साजरा केला. त्याचवेळी आता कार्यकर्त्यांना गणेशाेत्सवाचे वेध लागल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसह पाेलीस, प्रशासन यांना दहीहंडी उत्सव हा गणेशाेत्सवाची रंगीत तालीमच ठरत असताे. सकाळपासूनच दहीहंडी उत्सवासाठी कार्यकर्त्यांची तयारी सुरु हाेती. माेठ्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या साऊंड सिस्टीम्सचे मनाेरेच शहरात उभे राहण्यास पाहण्यास मिळाले.
दुपारनंतर क्रेनच्या माध्यमातून दहीहंड्या चढविण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी रस्त्याच्या दाेन्ही कडेच्या इमारतींवर दाेर लावून हंड्या बांधण्यात आल्या हाेत्या. फुलांप्रमाणेच इतर सजावटीच्या साहीत्यातून दहीहंड्याचे साैंदर्य खुलविण्यात आल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. याच दरम्यान, साऊंड सिस्टीम्सचा दणदणाटही सुरु झाला. उत्साहाच्या वातावरणात अधुन मधुन पडणाऱ्या पावसाच्या हलक्या सरींमुळे आल्हाददायकता निर्माण झाली हाेती. सांयकाळनंतर मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शहराच्या इतर भागातील गाेविंदा पथकांकडून दहीहंडी फाेडण्यास सुरुवात झाली होती.
डिजे मुक्त दहीहंडी
उद्याेजक पुनीत बालन यांच्या पुढाकाराने यंदा ‘डिजेमुक्त दहीहंडी’ ही माेहीम सुरु झाली आहे. पंचवीसहून अधिक मंडळांनी या माेहीमेला पाठींबा दिला. या सर्वांच्या सहकार्याने लालमहाल चाैक येथे ‘डिजेमुक्त दहीहंडी’ उभारण्यात आली. यावेळी साऊंड सिस्टीमच्या ऐवजी रमणबाग, शिवमुद्रा, समर्थ, जय शिव, युवा या ढाेल ताशा पथकांनी सादरीकरण केले. तसेच प्रभात बॅंड यांचे वादनही झाले.
मध्यवर्ती भागाप्रमाणेच उपनगरातही उत्साह
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सुवर्णयुग तरुण मंडळ ( श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ), बाबु गेणू मंडळ, श्रीकृष्ण तरुण मंडळ, अखिल गणेशपेठ पांगुळआळी सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळ, पतित पावन संघटना तसेच इतर महत्वाच्या गणेश मंडळे, तसेच विविध प्रतिष्ठान, संस्थांकडून दहीहंडी उत्सवाचे आयाेजन केले हाेते. तसेच उपनगरातही माेठ्या प्रमाणावर दहीहंडीचा सण उत्साहात पार पडला. यामध्ये काेथरुड येथील शिवशाही प्रतिष्ठान (डी. पी. राेड ) आणि वनाज जवळील ओम चॅरिटेबल ट्रस्ट यांची महिलांची दहीहंडी या दरवर्षीप्रमाणे वैशिष्ठ्यपुर्ण ठरल्या. ओम चॅरिटेबल ट्रस्टची दहीहंडी ही महीलांसाठीच आणि महिला गाेविंदा पथकाकडूनच फाेडली जाते. कल्याणीनगर येथे आदीनाश शिंदे यांच्या पुढाकाराने राजयाेग प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडीचे आयाेजन केले हाेते. कात्रज येथे अजितदादा बाबर युवा मंचच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयाेजन केले हाेते.