म्यानमार सैन्याचा स्वतःच्याच देशावर हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Myanmar airstrike Mogok : म्यानमारमध्ये लष्करी राजवटीचे अत्याचार दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहेत. देशाच्या उत्तरेतील मोगोक शहरात सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात गर्भवती महिला, निरपराध नागरिक, बौद्ध भिक्षू यांच्यासह किमान २१ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत १५ घरे आणि धार्मिक स्थळांचाही चुराडा झाला असून, मृतांचा आकडा प्रत्यक्षात आणखी जास्त असल्याचा स्थानिकांचा दावा आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये आंग सान सू की यांच्या लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारकडून सत्ता काबीज केल्यानंतर म्यानमारमध्ये भीषण अराजकता माजली आहे. शांततापूर्ण निदर्शने बळाचा वापर करून दडपल्याने हजारो नागरिकांनी शस्त्र उचलली आणि देशाचे गृहयुद्धात रूपांतर झाले. या पार्श्वभूमीवर लष्कराने विरोधी गट व सामान्य जनता यांच्यातील सीमारेषा पुसून टाकली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत…’ शी जिनपिंग यांचे नाव घेऊन ट्रम्प यांचे धाडसी विधान
मंडालेपासून सुमारे ११५ किमी अंतरावर असलेल्या मोगोकच्या श्वेगु वॉर्ड परिसरात गुरुवारी रात्री ८.३० वाजता लढाऊ विमानातून बॉम्बवर्षाव करण्यात आला. ताआंग नॅशनल लिबरेशन आर्मी (TNLA) या वांशिक गटाने सांगितले की, या हल्ल्यात केवळ लढवय्येच नव्हे तर नागरिक आणि महिलांचा मोठा बळी गेला. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या ३० च्या पुढे असण्याची शक्यता आहे. हल्ल्यातील बळींमध्ये १६ महिला होत्या, तर दोन बौद्ध भिक्षूंसह अनेक नागरिक जखमी झाले. ढिगाऱ्यातून निघालेल्या फोटो-व्हिडिओंनी जगाला हादरवून सोडले.
On 14 August: Military junta’s airstrike in Mogoke Town’s residential area killed 2️⃣1️⃣+ civilians including pregnant #women & #children.
There was no battle but continues targeting civilians. Stop supporting #junta to save lives in #Myanmar.
Source: https://t.co/jtSlREZML6… pic.twitter.com/0BLClIQ0Ow
— CRPH Myanmar (@CrphMyanmar) August 16, 2025
credit : social media
या हवाई हल्ल्यात बौद्ध मठ, रहिवासी घरे आणि स्थानिक पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या. “कायद्याचे लक्ष्य” असल्याचा दावा करणाऱ्या लष्कराने घटनेवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र इतिहासात अनेकदा दिसल्याप्रमाणे, त्यांचा ‘कायदेशीर लक्ष्यां’चा दावा हा नागरिकांच्या हत्याकांडाला झाकण्यासाठीच असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे.
फक्त ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांतच TNLA च्या नियंत्रणाखालील भागात झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये १७ जण मृत्यूमुखी पडले, ज्यात दोन भिक्षूंचाही समावेश होता. मध्य म्यानमारमधील सागाईंग शहराजवळ गेल्या सोमवारी झालेल्या आणखी एका हल्ल्यात १६ ट्रकचालकांना जीव गमवावा लागला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Earthquake : इंडोनेशियातील ‘रिंग ऑफ फायर’ पुन्हा सक्रिय; आठवड्यात दुसरा भूकंप; सुलावेसी हादरले
म्यानमारमध्ये या वर्षाअखेरीस निवडणुका होणार असल्याचे लष्करी सरकारने जाहीर केले आहे. मात्र या निवडणुका फक्त दिखावा असल्याचे विरोधी पक्ष व स्वतंत्र विश्लेषक मानतात. सू की यांच्या पक्षातील प्रमुख नेते तुरुंगात आहेत, स्वायत्त मीडिया नाही आणि विरोधकांना चिरडण्यासाठी हवाई हल्ल्यांचा मारा सुरू आहे. त्यामुळे या निवडणुका केवळ लष्करी राजवटीला वैध ठरवण्याचे साधन ठरणार असल्याचा आरोप होत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर निंदा होत असली तरी म्यानमार लष्करावर त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. नागरिक, महिला, मुले, भिक्षू आणि अल्पसंख्याक गटांचे प्राण घेत असलेले हे हवाई हल्ले आधुनिक जगातल्या सर्वात भीषण मानवी हक्क हननाचे उदाहरण ठरत आहेत.