कझाकिस्तान विमान अपघातावर पुतिन यांनी मागितली माफी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मॉस्को: कझाकिस्तानमध्ये झालेल्या विमान अपघाताबाबत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी माफी मागितली आहे. मात्र त्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांनी अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्याशी चर्चा करून दुःख व्यक्त केले आहे. हा अपघात बुधवारी झाला होता, ज्यामध्ये 38 लोकांचा मृत्यू झाला आणि 29 जण जखमी झाले. अझरबैजानी विमानाने बाकू येथून चेचन्याच्या ग्रोजनीकडे उड्डाण केले होते. उड्डाणानंतर थोड्याच वेळात मार्ग बदलून ते कझाकिस्तानमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला.
क्रेमलिनचे निवेदन
तर, याबाबत रशियाने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले की, बुधवारी ग्रोजनीजवळील वायू संरक्षण प्रणालींनी केलेल्या गोळीबारामुळे हा अपघात झाला. मात्र, विमान हे रशियन वायू संरक्षण प्रणालीच्या गोळीबाराचे लक्ष्य बनले असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. पुतिन यांनी अझरबैजानी अध्यक्षांशी फोनवर चर्चा करताना कझाकिस्तानमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेसाठी माफी मागितली आहे. क्रेमलिनने स्पष्ट केले की ही दुर्घटना त्यांच्या हवाई क्षेत्रात घडली असली, तरी ती रशियन हवाई संरक्षण यंत्रणेच्या चुकांमुळे घडल्याचे मान्य नाही.
38 लोकांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, कझाकिस्तानमध्ये झालेल्या या अपघातात 67 प्रवासी विमानात होते. अपघातानंतर विमानाने पेट घेतला. कझाकिस्तानच्या मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 38 लोकांचा मृत्यू झाला, तर उर्वरित प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अझरबैजानच्या अभियोजक जनरल कार्यालयाने सांगितले की, ग्रोजनीमध्ये दुर्घटनेची तपासणी सुरू आहे. तसेच पोलिसांनी सांगितले की, विमानाच्या मागील भागात काही छिद्रे दिसत आहेत.
तसेच विमानावर रशियन वायू संरक्षण प्रणालीचा गोळीबार झाला असावा, असा संशय विमानतज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या युक्रेन आणि रशियामधील संघर्षामुळे परिस्थिती तणावपूर्ण आहे. युक्रेनने ड्रोन हल्ला केल्यामुळे रशियन वायू संरक्षण प्रणाली सक्रिय झाली होती. या संदर्भात विमान अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अधिकृत तपासानंतरच याबाबत निश्चित माहिती समोर येईल.
आंतरराष्ट्रीय पडसाद
या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावरही खळबळ उडवली आहे. पुतिन यांनी केलेल्या माफीमुळे अझरबैजानसोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न दिसून येतो. तसेच, विमान अपघाताचा तपशील समजून घेण्यासाठी आणखी वेळ लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.