फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बिजिंग: जागतिक बँकेने चीन संबंधित नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात चीनसाठी 2025 हे आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक वर्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अहवालानुसार, चीनची GDP वाढ 2024 मध्ये 5% राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, 2025 मध्ये ती घसरून 4.5% होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मालमत्ता क्षेत्रातील दीर्घकालीन संकट, कमी उत्पन्नवाढ आणि उच्च शुल्काचा फटका यामुळे चीनची आर्थिक परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे.
मालमत्ता क्षेत्राचे संकट
अहवालानुसार, चीनच्या मालमत्ता क्षेत्रातील संकट हे देशांतर्गत आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. घरांच्या कमी किमती आणि गुंतवणुकीत घट झाल्यामुळे आर्थिक स्थिरतेवर परिणाम झाला आहे. यामुळे चीनमध्ये नागरिकांच्या उत्पन्न वाढीचा वेग कमी झाला आहे. जागतिक बँकेच्या संचालिका मारा वॅरिक यांनी सुचवले आहे की, मालमत्ता क्षेत्रातील संकटाचा सामना करण्यासाठी चीनने व्यापक धोरणे तयार करावी लागतील. यामुळे कुटुंबांना आर्थिक संधी मिळतील आणि विषमता कमी होईल असा अंदाज मारा वॅरिक यांनी वर्तवला आला आहे.
उच्च शुल्काचा फटका
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडून अधिक शुल्क आकारण्याची धमकी दिली आहे. कॅनडा आणि मेक्सिकोसह चीनवरील आयात शुल्क वाढवल्यामुळे जागतिक व्यापारातील तणाव वाढू शकतो. विशेषतः चिनी वस्तूंवर 10% अधिक कर लादल्याने चीनच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या उपायांनी चीनच्या जीडीपी वाढीवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.
GDP च्या वाढीचा घटता दर
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये चीनची GDP वाढ 5% होण्याचा अंदाज आहे, जो आधीच्या 4.8% च्या अंदाजापेक्षा जास्त आहे. परंतु 2025 मध्ये GDP चा वाढीचा दर 4.5% होण्याची शक्यता आहे. मात्र, यापूर्वी तो 4.1% असण्याचा अंदाज होता. या घसरणीला मालमत्ता क्षेत्रातील अस्थिरता आणि नागरिकांच्या संपत्तीतील घट कारणीभूत ठरणार आहे.
चीनने आर्थिक संकटावर मात करण्यासाठी 3 ट्रिलियन युआन (सुमारे $411 अब्ज) विशेष ट्रेझरी बाँडमध्ये गुंतवणूक करण्याचे मान्य केले आहे. जागतिक बँकेच्या म्हणण्यनुसार, स्थानिक सरकारी वित्त सुधारणा आणि धोरणात्मक उपायांमुळे चीनला आर्थिक स्थिरता मिळवण्यात मदत होईल. चीनसाठी 2025 हे आव्हानात्मक वर्ष असेल, परंतु योग्य धोरणे स्वीकारल्यास संकटाचा प्रभाव कमी करता येईल.