फोटो सौजन्य: सोशल मीडिया
इस्लामाबाद: पाकिस्तानी सैन्याने भारतावर 27 डिसेंबर 2024 रोजी आयोजित केलेल्या वार्षिक पत्रकार परिषदेत नियंत्रण रेषेचा 25 वेळा उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्यांनी दावा केला आहे की, भारताने काहीवेळा ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन’केल्याचे दिसून आले आहे. ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन’म्हणजे एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला दोषी ठरवण्यासाठी मुद्दाम बनावट लष्करी कारवाया करण्याची पद्धत. यामुळे भारत संतप्त झाला आहे.
भारताने RAW द्वारे बनावट कारयवाया केल्या आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारतावर आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारच्या बनावट कारवायांचा प्रचार भारताच्या परदेशी गुप्तचर संस्था ‘RAW’ द्वारे चालवण्यात येणाऱ्या फर्जी सोशल मीडिया खात्यांद्वारे केला जातो. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, पाकिस्तानच्या सैन्याकडे भारताच्या कोणत्याही आक्रमणाला निर्णायक प्रत्युत्तर देण्याची पूर्ण क्षमता आहे. मात्र, पाकिस्ताननी आपले दावे सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाहीत.
जम्मू कश्मीर आणि अल्पसंख्याकांवरील आरोप
लेफ्टिनेंट जनरल चौधरी यांनी जम्मू कश्मीरमधील परिस्थितीवर भाष्य करताना देखील भारतावर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, भारतीय सैन्याने काश्मीरमधील स्वातंत्र्यलढ्याला चिरडण्यासाठी क्रूर धोरणे स्वीकारली आहेत. शिवाय, त्यांनी भारतावर देशातील आणि परदेशातील अल्पसंख्याक, विशेषतः शीख समुदायाला लक्ष्य करण्याचा आरोप केला.
पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी मोहिमा
तसेच, पाकिस्तानी सैन्याने 2024 मध्ये बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतांमध्ये 60,000 पेक्षा जास्त दहशतवादविरोधी मोहिमा राबवल्याचा दावा केला. या मोहिमांमध्ये 925 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून 383 जवानांनी प्राण गमावले. प्रवक्त्यांनी सांगितले की, दैनंदिन 170 मोहिमा राबवल्या जात आहेत, ज्यामुळे अनेक दहशतवादी कारवाया रोखण्यात यश आले आहे.
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर आरोप
पाकिस्तानी सैन्याने अफगाण तालिबानवर प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ला आश्रय देण्याचा आरोप केला. त्यांनी अफगाण सरकारला TTP दहशतवाद्यांना थारा न देण्याचे आवाहन केले. चौधरी यांनी सांगितले की अफगाण भूमीचा वापर करून दहशतवादी पाकिस्तानात हल्ले घडवून आणत आहेत.
या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तानने सीमा ओलांडणाऱ्यांसाठी ‘एक-दस्तावेज’ प्रणाली लागू केली आहे, ज्यामुळे अनधिकृत हालचालींमध्ये घट झाली आहे. पाकिस्तानच्या सैन्याच्या या आरोपांमुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.