रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मॉस्को: सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युक्रेनने रशियावर नुकताच आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. यामुळे रशियाचे मोठे नुकसान झाले. युक्रेनने दावा केला की, त्यांनी एकाच वेळी शेकडो ड्रोन हल्ले रशियाच्या लष्करी विमानतळांवर केले. या हल्ल्यात रशियाचे किमान ४० बॉम्बर आणि लढाऊ विमानांचे नुकासन झाल्याची माहिती आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी करत याला दहशतवादी हल्ला संबोधले आहे. युक्रेनने मुर्मन्स्क, इर्कुत्सक, इवानोवो, रियाझाना आणि अमूर या रशियाच्या प्रमुख भागांमध्ये हल्ला केला.
दरम्यान सीएनएनला दिलेल्या मुलाखतीदरम्यान रशियाचे माजी उपफर्जा मंत्री व्लादिमिर मिलोव्ह यांनी म्हटले की, हा हल्ला रशियाच्या सुरक्षा व्यवस्थांच्या अपयशावर प्रकाश टाकतो. ही रशियासाठी मोठी लाजिरवाणी बाब आहे. परंतु रशिया लवकरच युक्रेनविरुद्ध कडक आणि आक्रमक कारवाई करेल, असा दावा व्लादिमिर मिलोव्ह यांनी केला आहे.
मिलोव्ह यांनी म्हटले की, युक्रेनची रशियावर अशा प्रकारे हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही युक्रेनने रशियाच्या कुर्स्क प्रदेशावर नियंत्रण मिळवले होते. तसेच रशियाच्या लष्करी तळावर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा युक्रेनचा हल्ला होत असतो, यामुळे आता हे सामान्य झाले आहे.
परंतु या हल्ल्यानंतर रशियाच्या सरकारमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. मिलोव्ह यांच्या म्हणण्यांनुसार, रशियन लोक देखील सूड घेण्याची मागणी करत आहे. युक्रेनला पूर्णपण नष्ट करण्याची मागणी रशियन नागरिकांकडून केली जातक आहे. तसेच लवकरच असे घडण्याची शक्यता देखील मिलोव्ह यांनी वर्तवली आहे.
मिलोव्ह यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन लवकरच युक्रेनविरोधात कठोर आणि आक्रमक पावले उचलण्याची शक्यता आहे. रशियाकडे अद्याप मोठी लष्करी क्षणता आहे. अशा परिस्थितीत पुतिन पुन्हा एकदा युक्रेनच्या शहरांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला करु शकतात असे मिलोव्ह यांनी म्हटले आहे. तसेच बॉम्बस्फोटांचीही शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
याशिवाय रशिया हा अण्वस्रधारी देश देखील आहे. यामुळे भविष्यात रशिया अण्वस्रांचा युक्रेनवर हल्ला करण्यासाठी वापर होऊ शकतो अशी शक्यता आहे. परंतु यावर मिलोव्ह यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
तसेच यापूर्वी पुतिन यांनी अनेक वेळा शत्रूला चोख प्रत्युत्त दिले आहे. रशिया नेहमीच सूड आणि क्रूरतेचा अवलंब करणारा राहिला आहे. यामुळे रशिया युक्रेनवर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचे मिलोव्ह यांनी म्हटले आहे. पुतिन यांची शांतता मोठ्या विनाशाचे संकेतही असून शकते असे मानले जात आहे.