फोटो सौजन्य: सोशल मीडिया
दमास्का: सीरियामध्ये हयात तहरीर अल शाम (HTS) या विद्रोही गटाने तिसऱ्या मोठ्या शहर ‘दारा’वर नियंत्रण मिळवल्याची माहिती समोर आली आहे. याआधी बंडखोरांनी हामा आणि होम्स ही दोन शहरे ताब्यात घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2011 साली असद सरकारविरोधातील आंदोलनाची सुरुवात दारा शहरातून झाली होती. विद्रोही गटांनी सीरियाच्या सैन्याशी करार केल्याने दारा शहरावर कब्जा केला आहे.
इराणचा असद सरकारला समर्थन न देण्याचा निर्णय
हे शहर जॉर्डन सीमेजवळ असून सीरियाची राजधानी दमास्का पासून अवघ्या 90 किलोमीटर अंतरावर आहे. 27 नोव्हेंबर 2024 पासून सीरियामध्ये सेना आणि विद्रोह्यांमध्ये लढाई सुरु झाली होती. नंतर 1 डिसेंबरला त्यांनी अलेप्पो शहर, त्यानंतर हमा शहर ताब्यात घेतले. दारा शहरावर ताबा मिळवल्यानंतर विद्रोही दमिश्कच्या जवळ पोहोचले आहेत. दरम्यान, इराणने आपल्या सैन्य अधिकाऱ्यांना सीरिया सोडण्याचे आदेश दिले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, इराणने असद सरकारचे समर्थन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्रोही गटांचे वाढते आक्रमण
विद्रोही गट HTS हा सध्या सीरियामधील सर्वात मोठा गट आहे. अल कायदा संघटनेशी संबंधित असलेल्या या गटाचे नेतृत्व अबू मोहम्मद अल-जुलानी करत आहे. 2017 मध्ये अल-नुसरा आणि इतर काही गटांनी एकत्र येऊन HTSची स्थापना केली. या गटाकडे सुमारे 30,000 लढवय्ये आहेत. अमेरिकेने 2018 मध्ये या गटाला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.
विद्रोह्यांच्या आक्रमणामुळे शिया समुदायाच्या लोकांना शहर सोडण्यास भाग पाडले आहे. दमिश्ककडे जाताना विद्रोही आता होम्सकडे आगेकूच करत आहेत. रशियाने त्यांच्या हालचाली रोखण्यासाठी हवाई हल्ले केले, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. असद सरकारला रशिया आणि इराणची मदत कमी होत असल्याने ते संकटात सापडले आहेत.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बंडखोरांच्या वाढत्या विद्रोहामुळे इस्त्रायलचीही चिंता वाढली
इस्त्रायल आणि लेबनानदरम्यान दीर्घकाळापासून सुरू असलेल्या संघर्षामध्ये नुकतेच युद्धविराम लागू झाले आहे. तर दुसरीकडे, सीरियामधील विद्रोही गटांनी अचानक हल्ले सुरू केल्याने इस्त्रायलसाठी नवी समस्या निर्माण झाली आहे. उत्तर आणि मध्य सीरियामधील काही प्रमुख सैन्य तळांवर आणि अस्त्र-शस्त्र प्रणालींवर विद्रोह्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये क्षेपणास्त्रे आणि रासायनिक शस्त्रांचा समावेश आहे. ही शस्त्रे विद्रोह्यांच्या हाती पडल्यास इस्त्रायलसाठी मोठा धोका ठरू शकतो.
भारतीय नागरिकांना देखील सीरियाला न जाण्याचा सल्ला
बंडखोरांच्या वाढत्या विद्रोहामुळे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील नागरिकांना सीरिया प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. सीरियामध्ये 90,000 भारतीय नागरिक असून, यामध्ये 14 संयुक्त राष्ट्राच्या संस्थांमध्ये कार्यरत आहेत. 2011 पासून सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे 3 लाखांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तर लाखो लोक विस्थापित झाले आहेत. विद्रोही गटांचे नियंत्रण वाढल्याने असद सरकारच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, असद सरकार विद्रोह्यांना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे.