नवी दिल्ली – सौदी अरेबियाचे पंतप्रधान आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांचा पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याला दुजोरा दिला आहे. शाहबाज शरीफ यांना सलमान यांच्या दौऱ्याची चांगलीच ओढ लागलेली होती, कारण या दौऱ्यात ते दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला ४.१ अब्ज डॉलर्सचे कर्ज देणार होते.
मीडिया रिपोर्टनुसार, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लॉन्ग मार्चमुळे पाकिस्तानात सध्या अनागोंदी आणि तणावाचे वातावरण आहे. यामुळेच प्रिन्स सलमान यांनी दौरा रद्द केला आहे. इम्रान खान इस्लामाबादमध्ये लगेच निवडणुकीच्या मागणीसाठी धरणेही देणार आहेत.
गेल्या महिन्यात शाहबाज शरीफ सौदीच्या दौऱ्यावर गेले होते. पहिल्यांदा असे झाले की दौऱ्यादरम्यान सौदीने पाकला कोणत्याही स्वरुपात मदतीची कोणतीही घोषणा केली नाही. एवढेच ठरले की प्रिन्स सलमान नोव्हेंबरच्या अखेरीस इस्लामाबादला येऊन पाकिस्तानला मोठ्या मदतीची घोषणा करतील. यानंतर प्रिन्स सलमान यांच्या दौऱ्याची पाकला प्रतीक्षा होती. मात्र हा दौरा रद्द झाला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय याविषयी स्पष्टपणे काहीही बोलणे टाळत आहे. त्यांच्यानुसार हा दौरा टळला आहे, रद्द झालेला नाही.