शाहबाज शरीफ यांची सौदी अरेबियाच्या मध्यस्थीची मागणी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Shahbaz Sharif Saudi mediation : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी संवाद साधून भारताशी चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे. त्यांनी सौदी नेतृत्वाला विनंती केली आहे की, भारताशी शांततापूर्ण चर्चा घडवून आणण्यासाठी ते मध्यस्थी करावी. शरीफ यांनी स्पष्टपणे नमूद केले की, POK, सिंधू पाणी करार, दहशतवाद, आणि व्यापाराशी संबंधित सर्व मुद्द्यांवर पाकिस्तान चर्चेसाठी तयार आहे. पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, शाहबाज शरीफ यांनी सौदी क्राउन प्रिन्स यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि भारताशी संबंध सुधारण्यासाठी सौदी अरेबियाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक निर्णय घेतले. त्यात अटारी-वाघा सीमेचे बंदीकरण, पाकिस्तानी नागरिकांचे भारतात परतणे, सार्क व्हिसा सवलतींचा रद्दबातल निर्णय, पाक उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची कपात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताने स्पष्ट भूमिका घेतली आहे की, POK आणि दहशतवादाचा प्रश्न निकालात काढल्याशिवाय कोणत्याही चर्चेला अर्थ नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran On IAEA : इराण IAEA सोबतचे सर्व संबंध तोडणार! संसदेने मंजूर केले विधेयक, म्हटले- ‘सुरक्षेची हमी…’
१९६० साली जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू जल वाटप करार झाला होता. या करारानुसार, पश्चिमेकडील नद्या – सिंधू, झेलम व चिनाब यांचे पाणी पाकिस्तानच्या ताब्यात, तर पूर्वेकडील नद्या, रावी, बियास आणि सतलज यांचे पाणी भारताच्या ताब्यात देण्यात आले. या वाटपात पाकिस्तानला एकूण ८०% आणि भारताला २०% पाणी मिळते. पण, दहशतवादासंदर्भात पाकिस्तानचा द्वेषयुक्त धोरण, सततचे घुसखोरीचे प्रयत्न आणि भारतातील दहशतवादी कारवाया पाहता भारताने हा करारच थांबवण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानने सिंधू कराराचा मुद्दा OIC मधील ५७ मुस्लिम देशांपुढे मांडला, तसेच परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या शिष्टमंडळाने विविध देशांत जाऊन भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याही देशाने याला गांभीर्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळेच आता शाहबाज शरीफ यांनी सौदी अरेबियाकडे मदतीची मागणी केली आहे. त्यांना आशा आहे की, सौदी नेतृत्व भारताशी मध्यस्थी करू शकेल.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ६-७ मे दरम्यान ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद व हिजबुल मुजाहिदीन यांचे नऊ ठिकाणी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर चिडलेल्या पाकिस्तानने प्रतिहल्ल्याचा निष्फळ प्रयत्न केला, ज्यात भारतीय वायुसेनेच्या कारवाईत नूर खान हवाई तळासह महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांचे नुकसान झाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran On IAEA : इराण IAEA सोबतचे सर्व संबंध तोडणार! संसदेने मंजूर केले विधेयक, म्हटले- ‘सुरक्षेची हमी…’
शाहबाज शरीफ यांचा हा प्रयत्न पाकिस्तानच्या अंतर्गत दडपणाचे, आंतरराष्ट्रीय अलगावाचे आणि आर्थिक अपयशाचे द्योतक मानला जात आहे. भारत मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे – जोपर्यंत दहशतवाद आणि पीओकेचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत कोणतीही चर्चा शक्य नाही. सौदी अरेबियाचा पुढाकार आणि भारताची प्रतिक्रिया यावरच दोन्ही देशांत पुन्हा संवादाची शक्यता ठरेल. पण तोवर, भारत राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणार हे निश्चित आहे.