राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत अमेरिकेत TikTok वर बंदी; आता युजर्सच्या ट्रम्प यांच्यावर नजरा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉश्गिंटन: TikTok या शॉर्ट-व्हिडिओ प्लॅटफॉर्मने अमेरिका मधील आपले कार्य पूर्णतः थांबवले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 17 जानेवारी 2025 रोजी, अमेरिकी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव TikTok वर बंदी घालणाऱ्या कायद्याला मंजुरी दिली. यामुळे आता अमेरिकेतील नागरिक या अॅपचा वापर करू शकणार नाहीत. Apple Hub च्या माहितीनुसार, TikTok अॅप अमेरिकेच्या अॅप स्टोअरमधून देखील हटवण्यात आले आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेमुळे निर्णय
अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, TikTok संदर्भात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित चिंता व्यक्त केल्या जात होत्या. त्यांचा दावा होता की, चीनी सरकार TikTok च्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांवर नजर ठेवू शकते किंवा त्यांच्या मतांवर प्रभाव टाकू शकते. FBI चे संचालक क्रिस्टोफर रे यांनी सांगितले की, चीनी सरकार TikTok च्या सॉफ्टवेअरद्वारे अमेरिकन डिव्हाइसेसवर अनधिकृत प्रवेश मिळवू शकते.
याच सुरक्षाविषयक चिंतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन काँग्रेसने TikTok वर बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एप्रिल 2024 मध्ये या कायद्यावर स्वाक्षरी केली होती. TikTok ची मूळ कंपनी बाइटडांसने या निर्णयाविरोधात कोर्टात आव्हान दिले, परंतु सुप्रीम कोर्टाने या अपीलला फेटाळून लावले. अखेर, 19 जानेवारी 2025 पासून TikTok अमेरिका मधील आपली सेवा बंद करणार आहे.
ट्रम्प देऊ शकतात 90 दिवसांची मुदतवाढ
अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, ते TikTok ला 90 दिवसांची मुदतवाढ देऊ शकतात. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय त्यांनी अद्याप घेतलेला नाही. डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. ते सध्या राजधानी वॉशिंग्टन येथे पोहोचले असून, त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात TikTok वर काय निर्णय घेतला जातो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मस्क होणार टिक-टॉक चे मालक?
काही दिवसांपूर्वी अमेरिकेत TikTok वर बंदी लादली जाण्याच्या शक्यतांदरम्यान चीनकडून एक चकित करणारी बातमी समोर आली होती. TikTok ची मूळ कंपनी TikTok हे व्यासपीठ एलॉन मस्क यांना विकण्याचा विचार करत होते. चीनी अधिकाऱ्यांची प्राथमिकता टिकटॉक ला ByteDance च्या नियंत्रणाखाली ठेवण्याची आहे. मात्र, अमेरिकेत TikTok वर बंदी लावण्यात आल्यास एलॉन मस्क यांच्यासोबत व्यवहार होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात होते. यामुळे आता अमेरिकेत TikTok वर बंदी घालण्यात आली असून एलॉन मस्क टिक-टॉकचे नवे मालक होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
2020 पासून भारतात TikTok बॅन
याशिवाय, TikTok वर 29 जून 2020 पासून भारतात देखील बंदी घालण्यात आली होती. ही बंदी, देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि डिजिटल गोपनीयतेला असलेल्या धोक्याच्या कारणास्तव लागू करण्यात आली होती. भारत सरकारने या अॅपला 58 इतर चिनी अॅप्ससह बॅन केले होते.