अबू मोहम्मद अल-जोलानी(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दमास्कस: सीरियाच्या बंडकोरांनी देशाची राजधीनी दमास्कसवर विजय मिळवला.आणि राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे 24 वर्षांचे शासन संपुष्टात आले. सध्या देशाची सत्ता आता बंडखोर गट हयात तहरीर अल-शाम (HTS) च्या ताब्यात आहे. बशर अल-असद यांच्या राजवटीविरोधात लढा देणाऱ्या एचटीएसने राजधानी दमास्कसवर ताबा मिळवून असद यांना देश सोडून पळण्यास भाग पाडले. तसेच त्यांनी हामा, होम्य आणि दारा या शहरांवरही ताबा मिळवला आहे.
कोण आहेत अल-जोलानी?
मिळालेल्या माहितीनुसार, एचटीएसचे नेतृत्व अबू मोहम्मद अल-जोलानी याच्या हातात आहे. अल-जोलानी हे पूर्वी अल-कायदाशी संलग्न होते, परंतु 2016 मध्ये त्यांनी संघटनेपासून वेगळे होत सीरियातील बशर अल-असद सरकारला सत्तेवरून हटवण्याचा निर्धार केला. अल-जोलानी यांचा जन्म 1982 मध्ये दमास्कसमध्ये झाला असून त्यांचे कुटुंब इस्त्रायलच्या गोलन हाइट्स भागातून विस्थापित झाले होते. ते कट्टरपंथी विचारांचे असूनही आधुनिक दृष्टिकोन स्वीकारण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करतात.हयात तहरीर अल-शाम (HTS) चा प्रमुख अबू मोहम्मद अल-जोलानी हे एक इस्लामिक नेता आहेत. मात्र, त्यांनी ते आधुनिक विचारांचा असल्याचा दावा केला आहे.
सीरियीची सत्ता HTS च्या नियंत्रणाखाली
सध्या सीरियाची सत्ता एचटीएसच्या नियंत्रणाखाली आहे, परंतु पूर्णतः हस्तांतरित झालेली नाही. राष्ट्राध्यक्ष असद यांच्या पळून गेल्यानंतर पंतप्रधान मोहम्मद गाझी अल-जलाली यांनी शांततेने सत्ता हस्तांतरणाचे आश्वासन दिले आहे. अल-जोलानी यांनीदेखील आपल्या सैन्याला सार्वजनिक स्थानांवरून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. नव्या सरकारची अधिकृत रचना पूर्ण होण्यासाठी काही काळ लागण्याची शक्यता आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
हस्तांतरणानंतर देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती स्पष्ट होईल
एचटीएसने देशाच्या प्रशासकीय बाबींवर काम करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. अल-जोलानी यांनी सांगितले की, सीरियन लोकांच्या मतानुसार निवडलेल्या नेतृत्वाला ते सहकार्य करतील. त्यामुळे भविष्यातील सरकारच्या स्वरूपावर अनेक चर्चा सुरू आहेत. सीरियाच्या सध्याच्या स्थितीत स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी जागतिक समुदायाकडूनही पुढाकार अपेक्षित आहे. बंडखोरांच्या विजयानंतर देशात मोठा बदल घडत आहे, पण सत्ता हस्तांतरणानंतरच देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती स्पष्ट होईल.
सीरियाचे भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित
सत्तांतराच्या प्रक्रियेमुळे देशातील अस्थिरता अधिक वाढण्याची शक्यता आहे. नवीन नेतृत्व कसे असेल, कोणत्या गटांना सामील केले जाईल, आणि देशातील विविध गटांमध्ये एकता प्रस्थापित होईल का, सध्या याबाबत अनिश्चितता आहे. विद्रोही गटांचे नेते अबू मोहम्मद अल-जुलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याचे राज्य संस्थांचे कार्य विद्रोही गटांच्या देखरेखीखाली चालू ठेवले जाईल. यामुळे सीरियाचे भविष्य काय असे यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.