संग्रहित फोटो
सासवड/संभाजी महामुनी : पुणे शहरापासून अत्यंत जवळचा तालुका म्हणून पुरंदरची ओळख आहे. सासवड शहर पुण्याचे उपनगर म्हणून बघितले जात आहे. मात्र, सध्या तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना संघटीतपणे मारहाण केली जात आहे. दुचाकीस्वार सायलेन्सरच्या पुंगळ्याचे मोठाले आवाज करून मोकाट फिरत आहेत. चोरीच्या मोठमोठ्या घटनांचा तपास केवळ कागदावर दिसत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारी, केबल चोरून नेल्या जात आहेत. एकूणच गुन्हेगार मोकाट सुटल्याचे दिसत असून पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सासवडचे पोलिस स्टेशनची मागील काही महिन्यापूर्वी संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होती. पोलिस कर्मचाऱ्यांतील अंतर्गत वाद आणि बेकायदेशीर धंद्यातील वसुलीमुळे पोलिस अधिकाऱ्यांसह कित्येक कर्मचारी निलंबित तर काहींची बदली करावी लागली होती. वादग्रस्त कर्मचाऱ्यांची बदली आणि निलंबन प्रक्रिया थांबल्यानंतर मध्यंतरी पोलिस निरीक्षक कुमार कदम यांची सासवडला नव्याने नियुक्ती झाली. सुरुवातीचा काही काळ शांततेत गेला, सर्व आलबेल आहे, असे वाटत असतानाच गुन्हेगारांनी पुन्हा एकदा शिरकाव केला.
गावोगावच्या मारामाऱ्या, ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण पुन्हा एकदा वाढले. काही दिवसांपूर्वी तालुक्याच्या वनपुरी, आंबोडी, सोनोरी, कुंभारवळण, सुपे आणि परिसरातील विहिरीवरून केबल चोरून नेण्याच्या घटना घडल्या. ऐन हंगामात अशा घटना घडल्याने शेतकरी भयग्रस्त झाले होते. मात्र एकाही घटनेचा तपास करण्यात पोलिस यंत्रणेला यश आले नाही. मागील महिन्यात भिवडी येथील दिघे आणि मोकाशी वस्तीवर चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घरात घुसून महिलांच्या गळ्याला धारदार विळा लावून जीवे मारण्याची धमकी देत सोने, चांदीच्या दागिन्यांचा लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला.
याप्रकरणी शिवानी विशाल दिघे या महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यामध्ये नऊ तोळे वजनाचे सोन्याचे विविध दागिन्यांचा ऐवज लुटून नेला आहे. सोन्याचे वेडनी, सोन्याचे पट्टीघंटन, सोन्याची चेन, क्रीश्टलच्या मन्यामध्ये ओवलेले सोन्याचे घंटन, सोन्याचे रिंगजोड, पायातील जोडवी, चांदीच्या पट्टया, छल्ला, रोख रक्कम, असा सुमारे साडेपाच लाख पेक्षा जास्त रकमेचा ऐवज चोरीस गेला आहे. त्याचवेळी चोरट्यांनी शेजारी राहणाऱ्या लोकांच्या घरालाही बाहेरील बाजुने कडी लावून शेजारी राहणारे अलका संजय दिघे यांच्या घरात प्रवेश केला. परंतु, घरात त्यांना तिथे काहीही मिळाले नाही. तर जनाबाई महादेव दिघे (वय ५७) यांच्या घरातून २४ हजारांची रोकड नेली.
कर्णकर्कश आवाजाच्या गाड्यांची संख्येत वाढ
दुसऱ्या एका घटनेत फलटणकडून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बस क्रमांक ६२७०६ मधील चालक सचिन शामराव नाळे (रा. फलटण) यांना सासवडमध्ये एक चारचाकी गाडी आडवी आल्याने केवळ गाडी हळू चालवा, असे सांगितल्याचा राग येवून तिघा जणांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी रोहन मारुती जाधव, तेजस जगताप, सत्यम जगताप, सर्वजण (रा. सासवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप एक आरोपी फरार आहे. दरम्यान सासवडमध्ये टुकार लोकांची संख्या प्रचंड वाढली. दुचाकी सायलेन्सरचे जोरात आवाज करून एकप्रकारे कायद्याला आव्हान दिले जात आहे. काही दुचाकींवर कारवाई केली असली तरी कर्णकर्कश आवाजाच्या गाड्यांची संख्या अद्यापही कमी झाली नाही.
हे सुद्धा वाचा : पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
बेकायदेशीर धंदे जोमात सुरु
अलीकडे पोलिस ठाण्यात बोगस गुन्ह्यांची संख्या जास्त असून, अनेक घटनांत फिर्यादीनी खोटे गुन्हे दाखल केल्याचे दिसून आले आहे. नंतर पुढे काही दिसून आले नाही. पश्चिम भागातील भिवरी परिसरात बेकायदेशीर धंदे जोमात सुरु असून सासवडमध्येही मटका, चक्री तेजीत आहे. विशेष म्हणजे याबाबत स्वतः पोलीस निरीक्षकांना काहीही माहिती नसल्याचे सांगितले जात असल्याने कोणाच्या आशीर्वादाने धंदे सुरु आहेत ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूणच वरील घटनांचा आलेख पाहिल्यास पोलीस यंत्रणेला गुन्हेगारीवर आणि गुनेह्गारांवर वचक ठेवण्यात अपयश आल्याचे पाहायला मिळत आहे.






