सीरियाच्या नवीन राष्ट्रपतींचा आखाती देशांचा दौरा सुरु; 'या' राष्ट्राला दिली पहिली भेट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दमास्कस: गेल्या वर्षी 2024 मध्ये बंडखोर गट अल-शाम तहरीरने दहशतवादी हल्ले केले आणि सीरियातील असदची सत्ता संपुष्टात आणली. सध्या सीरियाचे नेतृत्व अल-शाम तहरीर गटाचे प्रमुख अल जुलानी यांच्या नेतृत्वाखाली असून मोहम्मद अल-जुलानी यांनी राजधानी दमास्कसमध्ये संविधान रद्द करून स्वतःला राष्ट्रपती घोषित केले आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
सीरियाच्या नवीन राष्ट्रपतींचा आखाती देशांचा दौरा सुरु
बशर-अल असदच्या पदाभार संभाळताच अनेक अरब राष्ट्रांनी राजधानी दमास्कसला भेट दिली आहे. आता सीरियाचे नवे अंतरिम राष्ट्रपती अल-जुलानी यांनी आखाती देशांना भेट देण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी या दौऱ्यात सौदी अरेबियाची राजधानी रियाधला भेट दिली आहे. सीरियाचा सौदी अरेबियाचा पहिला दौरा दमास्कच्या प्रादेशिक मित्रापासून इराणपासून दूर नेत असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. असद सरकारच्या सत्तेत इराणचा सीरियावर खोलवर असलेला प्रभाव आता संपुष्टात येत असल्याचे म्हटले जात आहे.
अल-जुलानी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षीच्या अखेरच्या महिन्यात हयात-तहरीर अल-शामच्या विद्रोही गटाने हल्ला केला आणि असदची सत्ता नष्ट केली. एकेकाळी हा विद्रोही गट अल-कायदाशी जोडलेला होता, मात्र आता तो एक उदारमतवादी संघटना म्हणून जगापुढे सादर होत आहे.
सीरियाच्या सौदी अरेबियाकडून अपेक्षा
अरब प्रदेशातील सर्वात शक्तिशाली देशा म्हणून सौदी अरेबियाला ओळखले जाते. यामुळे सौदी अरेबिया सीरियाला संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक प्रकारची मदत करु शकतो. सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी जानेवारीत दमास्कसला भेट दिली होती. या भेटी दरम्यान त्यांनी, रियाध सीरियावरील निर्बंध उठवण्यासाठी “सक्रियपणे वाटाघाटी” करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. यामुळे सौदी अरेबियाचे निर्बंध उठल्याने सीरियाचे संबंध अधिक बळकट होण्यास मदत होऊ शकते.
तख्तापलट कसा घडला?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2016 मध्ये सीरियाचे गृहयुद्ध थांबल्यानंतर, जुलानी आपल्या लढाऊ शक्तीला मजबूत करण्यासाठी लागले. इस्त्रायल-हमास आणि रशिया युक्रेन युद्धाच्या वेळी त्यांना योग्य संधी मिळाली. रशिया युक्रेन युद्धात व्यस्त असताना त्याने सीरियातून आपले सैन्य काढून घेतले. तर 2023 मधील इस्त्रायल-हमास युद्धामुळे, इराण आणि हिजबुल्लाह सैन्य देखील सीरियातून हटवण्यात आले.
या संधीचा फायदा घेत, जुलानी यांनी सीरियन सैन्यावर हल्ला करून 11 दिवसांत राष्ट्रपतींचा सत्तापालट केला. सीरियातील या सत्तापालटामुळे देशाच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत मोठे बदल झाले आहेत. आता अल जुलानी यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार कसे कार्य करेल आणि सीरियाचा भविष्यातील मार्ग कसा असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.