ना मिसाईल, ना बंदूक... या छोट्याशा शस्त्राने दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये माजवलीय दहशत
पाकिस्तानमध्ये सध्या दहशतवाद्यांनी नवा आणि अत्यंत धोकादायक मार्ग स्वीकारला आहे. मिसाईल, बंदूक किंवा चाकू न वापरता, या दहशतवाद्यांनी आता ‘क्वाडकॉप्टर’ या छोट्याशा ड्रोनच्या माध्यमातून थेट पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात अशा हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली असून, या भागात वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण आहे.
पृथ्वीचा वेग वाढतोय! मानव इतिहासातील सर्वात ‘लहान दिवस’ जुलै-ऑगस्टमध्ये अनुभवण्याची शक्यता
खैबर पख्तूनख्वाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमकी होत आहेत. लक्की मरवात, कलाची आणि वजीरिस्तान हे तीन अत्यंत संवेदनशील भाग आहेत, जिथे सध्या परिस्थिती अधिकच चिघळली आहे. केवळ 28 जून रोजीच, उत्तर वजीरिस्तानमधील गुलाम खान परिसरात झालेल्या हल्ल्यात सहा जवान जखमी झाले होते. त्यानंतर लगेचच या भागात आत्मघाती हल्ला करण्यात आला, जो पाकिस्तानातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. पुलवामा हल्ल्याच्या पद्धतीने झालेल्या या हल्ल्यात आत्मघाती दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेले वाहन थेट सैन्याच्या ताफ्यावर आदळवले.
या सर्व घडामोडींमध्ये विशेष लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे ‘क्वाडकॉप्टर’चा वाढता वापर. हे क्वाडकॉप्टर म्हणजे छोटेखानी ड्रोन असून, दहशतवादी त्याचा वापर स्फोटके टाकण्यासाठी करत आहेत. बीबीसी उर्दूने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांनी सांगितले की, सध्या या भागात जणू गुरिल्ला युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजू एकमेकांवर हल्ले करत असून, यात नागरिकच अधिक प्रमाणात बळी पडत आहेत. 19 मे रोजी क्वाडकॉप्टरने एका घरावर स्फोटक टाकले होते, ज्यात चार बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतरही या भागात क्वाडकॉप्टरद्वारे आणखी हल्ले झाले आहेत. मारी अलीच्या होर्मुज भागात देखील अशाच पद्धतीने दहशतवाद्यांनी ड्रोनहल्ले केले आहेत.
पाकिस्तानने या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी अफगाणिस्तानसोबत असलेली गुलाम खान सीमा तातडीने बंद केली आहे. शिवाय, उत्तर वजीरिस्तानमध्ये कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. वजीरिस्तानमधील बिघडलेली परिस्थिती पाहता, पाकिस्तान लवकरच मोठ्या प्रमाणात सैन्य कारवाई करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या हल्ल्यांमागे मुख्यतः तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या संघटनेचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संघटनेने काही हल्ल्यांची जबाबदारी उघडपणे स्वीकारली आहे. बीबीसी उर्दूशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक फरजाना अली यांनी सांगितले की, TTP आता आपला प्रभाव वाढवण्यात यशस्वी झाली आहे आणि क्वाडकॉप्टरद्वारे होणारे हल्ले ही मोठी चिंता निर्माण करणारी बाब आहे. आतापर्यंत जी पद्धत TTP वापरत होती, त्यापेक्षा हा नवा तंत्रज्ञानाधारित हल्ला अधिक घातक ठरत आहे.
‘या’ देशाची तालिबान विरोधात मोठी कारवाई; लाखो अफगाण निर्वासितांना केले देशातून हद्दपार
TTP व्यतिरिक्त या भागात इतर उग्रवादी गटही सक्रिय झाले आहेत. तालिबानचा हाफिज गुल बहादुर गट, लश्कर-ए-इस्लाम, तहरीक-ए-इंकलाब-ए-इस्लामी आणि इत्तेहाद-ए-मुजाहिदीन पाकिस्तान हे तीन प्रमुख उग्रवादी गट देखील या भागात सातत्याने हालचाली करत आहेत. विशेष म्हणजे, खैबर पख्तूनख्वामध्ये अलीकडे हल्ले करणाऱ्या असवद अल-हरब या गटाचे संबंध देखील हाफिज गुल बहादुर गटाशी असल्याचे समोर आले आहे.
संपूर्ण दक्षिण पख्तूनख्वा भाग सध्या तणावाखाली आहे. दहशतवाद्यांचे वाढते हल्ले, क्वाडकॉप्टरचा अत्याधुनिक वापर आणि सीमावर्ती भागातील असुरक्षितता यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षेला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पाकिस्तानने आता या नव्या धोक्याला कसे तोंड देणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.