ICC टी२० क्रमवारीत पाकच्या साहिबजादा फरहानचा धुमाकूळ(फोटो-सोशल मीडिया)
ICC T20 Rankings : टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत १३ सामने खेळवण्यात आले आहेत. या स्पर्धे दरम्यान, आयसीसीकडून ताजी टी२० क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत भारताचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा फलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखून आहे. तर वरुण चक्रवर्ती गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. तथापि, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत मात्र मोठा फेरबदल झाला आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा टी२० स्वरूपात पहिल्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : श्रीलंकेला मोठा झटका! टी२० विश्वचषकातून वानिंदू हसरंगा बाहेर, ‘या’ खेळाडूची लागली वर्णी
तसेच, पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहानला ताज्या क्रमवारीत देखील मोठा फायदा झाला आहे. अमेरिकेविरुद्धच्या त्याच्या ७३ धावांच्या खेळीमुळे तो आता चार गुण मिळवून टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत सातव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर येऊन पोहोचला आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये भारताचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा पहिल्या, इंग्लंडचा फिल साल्ट दुसऱ्या, पाकिस्तानचा साहिबजादा फरहान तिसऱ्या, इंग्लंडचा जोस बटलर चौथ्या आणि भारताचा तिलक वर्मा पाचव्या स्थानावर विराजमान आहेत. श्रीलंकेचा पथुम निस्सांका सहाव्या स्थानावर आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव सातव्या, तर न्यूझीलंडचा टिम सेफर्ट आठव्या, ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड नवव्या आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श दहाव्या स्थानावर आहेत.
आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वरुण चक्रवर्ती पहिल्या स्थानी कायम आहे. तर पाकिस्तानचा अब्रार अहमद दुसऱ्या स्थानी आहे. तसेच, अफगाणिस्तानचा रशीद खान तिसऱ्या स्थानावर असून इंग्लंडचा आदिल रशीद चौथ्या स्थानावर आहे, तर श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा पाचव्या स्थानावर विराजमान आहे.
झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने मोठी कामगिरी केली आहे. त्याने पाकिस्तानच्या सैम अयुबला मागे टाकत अव्वल स्थान बाळकवले आहे. अयुब दुसऱ्या स्थानावर असून भारताचा हार्दिक पंड्या तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. वेस्ट इंडिजचा रोस्टन चेस चौथ्या स्थानावर असून पाकिस्तानचा मोहम्मद नवाज पाचव्या स्थानी आहे. नेपाळचा दीपेंद्र सिंग अरे सहाव्या स्थानावर विराजमान आहे.






