अमेरिकन सरकारनेह इस्रायलला आधुनिक शस्त्रास्त्रांची मोठी खेप पुरवण्यास मान्यता दिली असून, त्यामुळे इस्रायलचे सैन्य अधिक शक्तिशाली होणार आहे. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
वॉशिंग्टन/तेल अवीव : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इस्रायलला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे विक्रीसाठी मान्यता दिली असून, त्यामुळे इस्रायली सैन्याची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. अमेरिका आणि इस्रायलमधील हा संरक्षण करार जवळपास ३ अब्ज अमेरिकी डॉलर्स किमतीचा असून, यात अत्याधुनिक दारूगोळा, बॉम्ब आणि लष्करी उपकरणांचा समावेश आहे.
ट्रम्प प्रशासनाचे धोरण आणि संरक्षण सहकार्य
अमेरिकेने रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास संघर्षाबाबत वेगळी धोरणे अवलंबली आहेत. ट्रम्प प्रशासनाने युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्यावर टीका करत त्यांच्यावर तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने जाण्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांनी इस्रायलबाबत अधिक सहानुभूती दाखवली असून, गाझा पट्टा पूर्णपणे इस्रायलच्या ताब्यात जाईल, असा दावा केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, 48 ड्रोन रशियन सैन्याने पाडले; अमेरिकेत ट्रम्प-झेलेन्स्की भेटीत वादंग
अब्जावधी डॉलर्सचे संरक्षण करार मंजूर
अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने काँग्रेसला कळवले आहे की, इस्रायलसाठी MK 84 आणि BLU-117 प्रकारच्या 35,500 बॉम्ब आणि 4,000 प्रिडेटर वॉरहेड्स विकण्याच्या कराराला मान्यता देण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रीय सुरक्षा आणीबाणीचे कारण देत, काँग्रेसच्या अनिवार्य पुनरावलोकन प्रक्रियेला वगळण्यात आले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी सांगितले की, इस्रायलच्या संरक्षणासाठी ही शस्त्रास्त्रे त्वरित पुरवली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे, या करारासाठी कोणतीही विलंब प्रक्रिया न ठेवता, त्वरित मंजुरी देण्यात आली आहे.
दारूगोळा आणि बुलडोझर विक्रीलाही मान्यता
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने पुढील वर्षापासून इस्रायलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू होईल, असे जाहीर केले आहे. याशिवाय, US$ 675.7 दशलक्ष किमतीच्या अतिरिक्त दारूगोळ्याच्या विक्रीलाही मंजुरी देण्यात आली आहे. या दारूगोळ्याची डिलिव्हरी 2028 पासून सुरू होणार आहे. तसेच, US$ 295 दशलक्ष किमतीचे D9R आणि D9T कॅटरपिलर बुलडोझर विक्रीला देखील मंजुरी देण्यात आली आहे. हे बुलडोझर मुख्यतः इस्रायली लष्कराच्या अभियंता तुकडीसाठी वापरले जातील.
हमासच्या प्रतिक्रिया आणि रमजानचा प्रभाव
या संरक्षण कराराच्या पार्श्वभूमीवर, हमासने प्रतिक्रिया देत इस्रायलने युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्याकडे जावे, अशी मागणी केली आहे. मात्र, इस्रायल सध्याच्या युद्धबंदीचा कालावधी वाढवण्याच्या विचारात आहे. दरम्यान, इस्लामिक जगतात रमजानचा पवित्र महिना सुरू झाला असून, अनेक अरब देशांमध्ये पहिला उपवास पाळला जात आहे. अशा परिस्थितीत, इस्रायल आणि हमासमध्ये तणावपूर्ण शांतता कायम असून, पुढील काही दिवस या संघर्षाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरू शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viral Video : ‘आजपासून तुमचे वाईट दिवस सुरू… ‘, ट्रम्प झेलेन्स्कीमध्ये जोरदार वादावादी, धमकीचा सूर
अमेरिका-इस्रायल संबंध आणखी मजबूत
या संरक्षण करारामुळे इस्रायलचे अमेरिकेसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. अमेरिकेच्या या निर्णयामुळे इस्रायली सैन्य अधिक सक्षम होणार असून, भविष्यातील संभाव्य संघर्षांसाठी ते अधिक सज्ज राहील. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प प्रशासनाच्या या धोरणामुळे पश्चिम आशियातील राजकीय समीकरणे आणखी बदलू शकतात.