रशिया-युक्रेन युद्ध कधी संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी भविष्यवाणी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
वॉशिंग्टन – रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत मोठा दावा केला आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी शनिवारी (२२ फेब्रुवारी) सांगितले की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना विश्वास आहे की आम्ही या आठवड्यात रशिया-युक्रेन युद्ध समाप्त करू शकतो.”
सौदी अरेबियामध्ये शांती चर्चेला सुरुवात
सौदी अरेबियाच्या राजधानी रियाधमध्ये वॉशिंग्टन आणि मॉस्कोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा झाली. या पहिल्या फेरीत युद्ध संपवण्याच्या दिशेने सकारात्मक वाटाघाटी झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, या चर्चेत युक्रेनला सहभागी करण्यात आलेले नाही, यावरून युरोपियन देशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. कॅरोलिन लेविट यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची टीम हा संघर्ष संपवण्यासाठी दोन्ही बाजूंसोबत वाटाघाटी सुरू ठेवण्यावर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करत आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘लॉरेंस भाई के लिए जान भी हाजिर…’ पाकिस्तानी गँगस्टर शेहजादच्या व्हिडिओने उडाली एकच खळबळ
युक्रेनच्या सहभागावर ट्रम्प यांची भूमिका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना शांतता चर्चेत सहभागी करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “झेलेन्स्की कोणत्याही करारावर पोहोचणे कठीण करतात, त्यामुळे त्यांच्या सहभागाशिवाय ही चर्चा होऊ शकते.” तथापि, पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले की, “रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना प्रत्यक्ष भेट घेणे आवश्यक असेल.”
युरोपियन मित्र देशांमध्ये चिंता वाढली
अमेरिका आणि रशियामधील शांतता चर्चेमुळे युरोपियन देश चिंतेत पडले आहेत. त्यांना भीती आहे की, युक्रेनच्या सहभागाशिवाय होणाऱ्या चर्चेमुळे रशियाला मोठा फायदा होईल. ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील जवळीक युरोपियन नेत्यांसाठी अधिकच चिंता निर्माण करत आहे. युक्रेनच्या पाठीशी उभे राहण्यास युरोपियन देशांना भाग पाडणाऱ्या परिस्थितीचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
युद्धविराम चर्चेची दुसरी फेरी जाहीर
युद्धविराम चर्चेच्या पुढील टप्प्यात आणखी निर्णायक चर्चा होणार आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, २५ फेब्रुवारी रोजी सौदी अरेबियाच्या रियाध येथे अमेरिका आणि रशियामधील दुसऱ्या फेरीची बैठक होईल. सी-स्पॅनला दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की, “ही चर्चा निर्णायक ठरण्याची शक्यता असून, यामध्ये अंतिम शांतता कराराचा निर्णय होऊ शकतो.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अखेर ट्रॅफिक जामचं टेन्शन संपलं, मार्केटमध्ये आली उडणारी कार; ‘इतक्या’ किमतीत होणार उपलब्ध
युद्ध लवकरच संपुष्टात येईल?
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वक्तव्यावर अनेक तज्ज्ञांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना वाटते की, अमेरिका रशियाशी थेट वाटाघाटी करत असल्यामुळे युक्रेनला अशक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. तर काही तज्ज्ञांचा विश्वास आहे की, हे युद्ध संपवण्यासाठी ही एक महत्त्वाची पावले आहेत. आगामी दिवसांत या चर्चांचे काय परिणाम होतील आणि रशिया-युक्रेन युद्ध संपुष्टात येईल का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.