२४ तासांत युक्रेनचा पलटवार! ओडेसा बंदरावरील हल्ल्याचे प्रत्युत्तर देत रशियाच्या साराटोव्हवर डागले ड्रोन
रशियाच्या साराटोव्हवरील हल्ल्यात किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. युक्रेनमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अवघ्या २४ तासांतच युक्रेनने ही कारवाई केली आहे. सध्या युद्ध संपवण्यासाठी अमेरिका आणि इतर काही देश शांतता चर्चा करत आहे. अशा परिस्थिती दोन्ही देशांचे एकमेकांवरील हल्ले वाढत असून परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनत चालली आहे. या हल्ल्यामुळे साराटोव्ह प्रदेशात एका निवासी इमारतीचे नुकसान झाले आहे. तसेच एका लहान मुलांच्या शाळेचे आणि क्लिनिकचेही नुकसान झाले आहे.
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने कीवच्या पायाभूत उर्जा सुविधांच्या केलेल्या नुकसानीमुळे अनेक भागांमध्ये वीजबंद आहे. युक्रेनचे अनेक भाग अंधारात बुडाले आहे. रशिया युक्रेनच्या पॉवर ग्रिड बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आणि यामुळे त्याच्या नागरिकांना थंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलेआहे. रशियाने हिवाळी वातावरणाला शस्त्रे बनवले असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान या हल्ल्याच्या काही तासांपूर्वीच रशियाने काळ्या समुद्रात तुर्कीच्या जहाजांवर हल्ला केला होता. तुर्कीच्या मालवाहू जहाजाला लक्ष्य करण्यात आले होते. हे जहाज युक्रेनसाठी पॉवर प्लांट्स आणि इतर काही उर्जा संसाधने घेऊन निघाले होते. परंतु रशियाने या जहाजावर हल्ला केला आणि त्यांना नुकसान पोहोचवणाऱ्यांना शिक्षा दिली जाईल अशी घोषणाही केली. यामुळे रशियाने तुर्कीला युक्रेनला मदत करण्याच्या बदल्यात धडा शिकवला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याच वेळी रशिया आणि तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची द्विपक्षीय बैठक देखील सुरु होती.
सध्या रशिया आणि युक्रेनच्या या वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देखील काही दिवसांपूर्वी हे युद्ध थांबवणे कठीण असल्याचे म्हटले होते. आता या हल्ल्यामुळे रशिया कधी आणि कुठे युक्रेनवर हल्ला करेल अनिश्चित आहे.






