नरसापुर एक्स्प्रेसवर दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी उलथून लावला (फोटो - सोशल मीडिया)
Nanded Crime News : पूर्णा : नरसापुरहुन नगरसोलकडे जाणाऱ्या सुपर फास्ट एक्स्प्रेस गाडीवर पिंगळी रेल्वे स्टेशनवर रविवारी (दि.८) पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्याच्या हेतूने दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा (Crime News) रेल्वे पोलिसांनी प्रयत्न हाणून पाडला आहे. पोलिसांनी या टोळीतील दोघांना अटक केली. तर इतर तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. अटक केलेल्या आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास पिंगळी रेल्वे स्थानकावर आरोपी दरोडा टाकण्यासाठी दबा धरून बसले होते. (Nanded News)
पिंगळी रेल्वे स्टेशनवरची घटना; दोन दिवस कोठडी
पोलिसांनी दोन दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. यावेळी आरोपी सखाराम किशनराव पवार (वय ५० रा. कमलापुर), गोपाल सखाराम पवार (वय २० रा. कमलापुर) या दोघांना अटक करून त्यांच्याकडून लोखंडी कत्ती, लोखंडी सुरी, भाला, मोबाईल, दोन मोटार सायकल असे प्राणघातक शस्त्र साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेल्या आरोपींमध्ये अविनाश श्रीराम काळे उर्फ ड्रिम (रा.फुलेवाडी सौताडा ता. पाटोदा जि. बीड) असे असून इतर दुसऱ्याचे नाव निष्पन्न झाले नाही असे पोलिसांनी सांगितले. अटक आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
हे देखील वाचा : बारामती अपघात प्रकरणातील मृत पिंकी माळीच्या कुटुंबियांना धमकी? राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
दरम्यान, रेल्वे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संशयास्पद हालचाली दिसून आल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले तर इतर तिघे आरोपी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून काही साहित्य जप्त केले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. दोन्ही आरोपीना नांदेडच्या न्यायालयात रविवारी हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, सपोनि शैलेश जोगदंड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नेगि, जमादार राम कातकडे, पोलीस शिपाई सखाराम पवार, राहुल दाभाडे, संजय भेडेकर, प्रविण कांबळे, रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक अमोल वावळे, काशीटवार, चव्हाण, रणचौरसिंग यादव यांनी यशस्वी केली आहे.
हे देखील वाचा : N फॉर North Korea, N फॉर नरक? इतके कडक निर्बंध, देशात जगणे जणू मरण्यासारखे






