ड्रोन युद्धात आघाडीसाठी अमेरिकेचा धडाकेबाज निर्णय! संरक्षण सचिवांनी ड्रोनकडूनच दस्तऐवज घेत केला मोठा खुलासा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
US small attack drones : रशिया-युक्रेन युद्धात ड्रोनच्या वापरामुळे युद्धाचे गणितच बदलले. या अनुभवातून धडा घेत अमेरिकेने आता ड्रोन युद्धात आघाडी घेण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी लहान, वेगवान आणि अत्याधुनिक ड्रोन बनवण्याचा नवा अध्याय सुरू केला असून, या संदर्भात त्यांनी अधिकृत ज्ञापनपत्रावर नाट्यमयरित्या स्वाक्षरी केली तेही एका ड्रोनकडूनच तो दस्तऐवज प्राप्त करून!
हेगसेथ यांनी पेंटागॉनच्या परिसरात ड्रोन युद्धासंबंधी नवीन धोरण जाहीर करताना एक अनोखी शक्कल लढवली. त्यांनी लॉनमध्ये उभं राहून आकाशातून येणाऱ्या ड्रोनकडून कागदपत्र घेतलं आणि त्या मेमोरँडमवर स्वाक्षरी केली. या ऐतिहासिक क्षणाचा व्हिडिओ अमेरिकन संरक्षण विभागाने सोशल मीडियावर शेअर केला असून, तो प्रचंड व्हायरल होत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता NASA वरही ट्रम्प सावट! 2000 लोकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, वैज्ञानिक प्रकल्पांवर संकट
हेगसेथ यांच्या घोषणेनुसार, अमेरिका आता केवळ मोठ्या ड्रोन (UAVs आणि RPV) मध्येच नव्हे, तर छोट्या आणि अधिक प्रभावी ड्रोनमध्येही आघाडी घेईल. सध्या चीन आणि रशिया दरवर्षी लाखोंच्या संख्येने लहान ड्रोन तयार करत आहेत. यामुळे अमेरिका या क्षेत्रात मागे पडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे लष्करी कमांडरना शक्य तितके ड्रोन वापरण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
हेगसेथ यांनी स्पष्ट केले की, छोट्या ड्रोनचा वापर हा केवळ तपासासाठी नाही, तर थेट लढाऊ क्षमतेसाठी देखील अत्यंत गरजेचा आहे. युक्रेन युद्धामध्ये केवळ एका रात्रीत रशियाने तब्बल ७०० ड्रोनने हल्ला चढवला होता, ज्यामुळे मोठी जीवितहानी झाली. ही आकडेवारीच ड्रोनच्या सामर्थ्याची साक्ष देते. नवीन मेमोरँडममध्ये पेंटागॉनने स्पष्ट म्हटले आहे की, ड्रोन हे २१व्या शतकातील युद्धातील सर्वात मोठं शस्त्र बनले आहे. यामुळे अमेरिकेने आता स्वतःचा औद्योगिक आधार मजबूत करण्यासाठी देशांतर्गत अभियंते, एआय (AI) तज्ञ आणि तंत्रज्ञांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : असीम मुनीर राष्ट्रपती होणार? पाकिस्तान सरकारचा सत्तापालटाच्या अफवांवर धक्कादायक खुलासा
हेगसेथ यांनी या निर्णयासाठी मागील बायडेन प्रशासनाला आणि नोकरशाहीला जबाबदार धरले. त्यांचा आरोप होता की, अमेरिकेने ड्रोन क्षेत्रात वेळेत गुंतवणूक न केल्यामुळे देश मागे पडला. आता याच चुका न पुन्हा होण्यासाठी त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेचा हा निर्णय जागतिक स्तरावर मोठ्या घडामोडी घडवू शकतो. यामुळे केवळ अमेरिकेचा लष्करी प्रभाव वाढेल असं नाही, तर जागतिक ड्रोन तंत्रज्ञानाच्या शर्यतीत अमेरिकेची पुन्हा आघाडी होऊ शकते.