७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेरिकेने दिल्या भारताला शुभेच्छा; म्हणाला... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी भारत अमेरिका संबंधांबद्दल सकारात्मक विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारत आणि अमेरिकेमधील भागीदारी नवीन उंची गाठत असून ही 21 व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण भागीदारी ठरेल. आज भारताने प्रजासत्ताक म्हणून 75 वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर, नवी दिल्लीत कार्तव्य पथावर पारंपरिक वार्षिक संचलनाद्वारे आपली लष्करी ताकद आणि सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्यात येणार आहे.
रुबियो यांनी दिल्या भारतातील जनतेला शुभेच्छा
मार्को रुबियो यांनी म्हटले की, “युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या वतीने, मी भारतातील जनतेचे प्रजासत्ताक दिनाच्या शुभप्रसंगी मनःपूर्व अभिनंदन करतो. भारतीय संविधान स्वीकारल्याच्या ऐतिहासिक क्षणाचे स्मरण करताना आम्ही या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या आधारस्तंभाचे महत्त्व ओळखतो,” असे रुबियो यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. तसेच भारत आणि अमेरिका संबंध अधिक नवीन उंची गाठतील असेही ते म्हणाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारतीयांना अमेरिकेची भुरळ का? धक्कादायक कारणंही आलं समोर
भारत-अमेरिका भागीदारीत नव्या उंची
रुबियो म्हणाले की, भारत आणि अमेरिकेमधील संबंध दिवसेंदिवस बळकट होत चालेले आहेत आणि हे नाते 21व्या शतकासाठी निर्णायक ठरणार आहे. याशिवाय “आपल्या दोन देशांतील जनतेमधील दीर्घकालीन मैत्री ही अमेरिकेच्या आणि भारताच्या सहकार्याचा पाया आहे आणि ती आर्थिक संबंधांच्या प्रचंड संभावनांना पुढे नेण्यास प्रेरित करते,” असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच रुबियो पुढे म्हणाले की, “अमेरिका पुढील वर्षात आपले सहकार्य अधिक दृढ करण्यास उत्सुक आहे. यामध्ये विशेषतः अवकाश संशोधन, क्वाडमधील समन्वय, तसेच मुक्त, खुल्या आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्राच्या उद्दिष्टासाठी सहकार्य करणे याचा समावेश आहे.”
रुबियो यांची एस. जयशंकर यांच्याशी पहिली द्विपक्षीय बैठक
रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची मंगळवारी (दि. 14 जानेवारी) पहिली द्विपक्षीय बैठक घेतली होती. ही त्यांच्या अमेरिकेचे परराष्ट्र सचिव म्हणून भारताच्या परारष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत पहिली बैठक होती. तसेच त्यांनी भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत क्वाडच्या पहिल्या मंत्रिस्तरीय बैठकीत भाग घेतला.
तसेच रुबियो यांनी ट्रम्प प्रशासन भारतासोबत संबंध मजबूत करण्यावर भर देत असल्याचे या बैठकीत अधोरेखित केले. रुबियो यांनी जयशंकर यांना सांगितले की, अमेरिका भारतासोबत आर्थिक संबंध पुढे नेण्यास इच्छुक आहे आणि अनियमित स्थलांतराशी संबंधित मुद्द्यांवर तोडगा काढण्यावर भर देत आहे. या द्विपक्षीय बैठकीनंतर जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅफॉर्म एक्सवर पोस्ट करताना रुबियो यांच्याशी पहिली द्विपक्षीय बैठक घेतल्याचा आनंद व्यक्त केला.