फोटो सौजन्य: सोशल मीडिया
जेरुसलेम: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संरक्षण मंत्री याव गॅलंट यांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी इस्रायल कॅट्झ यांना नवे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाझा आणि लेबनॉनमधील संघर्षाच्या वेळी गॅलंट यांची भूमिका असमाधानकारक ठरल्याने त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. युद्धाच्या काळात बेंजामिन नेतन्याहूंच्या या पावलाने सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या इस्रायल सात आघाड्यांवर युद्ध लढत असून त्यात गाझा स्थित हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह विरोधातील कारवायाही महत्त्वाच्या आहेत.
कॅट्झ 1998 पासून इस्रायलच्या संसदेमध्ये कार्यरत होते
इस्रायल कॅट्झ हे नेतन्याहूंच्या लिकुड पक्षाचे दीर्घकालीन सदस्य होते. कॅट्झ 1998 पासून इस्रायलच्या संसदेमध्ये कार्यरत होते. त्यांनी अनेक समित्यांमध्ये, विशेषत: परराष्ट्र, संरक्षण आणि न्याय यासारख्या महत्त्वाच्या समित्यांवर काम केले आहे. कॅट्झ यांनी कृषी, वाहतूक, बुद्धिमत्ता, वित्त, ऊर्जा आदी विविध खात्यांमध्ये मंत्रीपद सांभाळले आहे. 2019 मध्ये ते परराष्ट्र मंत्री बनले होते. त्यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
याआधी देखील परराष्ट्र मंत्री म्हणून भूमिका बजावली होती
1955 मध्ये इस्रायलच्या किनारपट्टीवर जन्मलेले कॅट्झ यांचे लष्करी जीवन 1973 मध्ये सुरू झाले. त्या ठिकाणी त्यांनी पॅराट्रूपर म्हणून सेवा बजावली. मात्र, गॅलंटप्रमाणे त्यांनी उच्च लष्करी पदे भूषवलेली नाहीत. परराष्ट्र मंत्री असताना कॅट्झ यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक ठोस पावले उचलली आहेत. विशेषतः ऑक्टोबरमध्ये संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्याविरोधात त्यांनी भूमिका घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अँटोनियो त्यावेळी इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा स्पष्ट निषेध करण्यात कमी पडले होते. यामुळे कॅट्झ यांनी अँटोनियो यांचा बहिष्कार केला होतो.
नवे संरक्षण मंत्री म्हणून कॅट्स यांच्यावर मोठी जबाबदारी
फ्रेंच सरकारने इस्रायली कंपन्यांना लष्करी नौदल व्यापार प्रदर्शनात सहभाग घेण्यास बंदी घातल्यानंतर त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा आदेश दिला. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्या इस्रायल दौऱ्यांदरम्यानही कॅट्झची भूमिका मर्यादित होती, कारण ब्लिंकनने अधिक बैठकांसाठी गॅलंटला प्राधान्य दिले होते. नवे संरक्षण मंत्री म्हणून कॅट्झ यांच्यावर गाझा आणि लेबनॉनमधील लष्करी कारवायांसह इस्रायलच्या संरक्षणासाठी मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी नेतन्याहू सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.