फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: मंगळवारपासून अमेरिकेत राष्ट्राध्यपदाच्या मतदानाला सुरूवात झालेली आहे. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरू आहे.अनेकांचे लक्ष या निवडणुकीत कोण जिंकले याकडे लागलेले आहे. दरम्यान अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकांसाठी मतदान सुरू असताना भारत-अमेरिका संबंधांच्या भविष्याबद्दल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील सकारात्मक भूमिका मांडली आहे. मात्र, कोण जिंकले तरी, भारत-अमेरिकन संबंध दृढ होण्याचे संकेत आहेत, असे जयशंकर यांनी सांगितले.
द्विपक्षीय संबंधांसाठी भारताचा विश्वास कायम
ऑस्ट्रेलियातील समकक्ष पेनी वोंग यांच्यासोबत पत्रकार परिषदेत असताना एस जयंशकर यांना अमेरिका-भारत संबंधांवर प्रश्न विचारला गेला. त्यावेळी एस. जयशंकर यांनी गेल्या पाच राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंधांमध्ये “स्थिर प्रगती” झाल्याचा उल्लेख केला. एस. जयशंकर यांनी म्हटले की, अमेरिकन निवडणुकीमध्ये निकाल कोणाच्याही बाजूने, परंतु द्विपक्षीय संबंधांसाठी भारताचा विश्वास कायम आहे.
हे देखील वाचा- अंतराळातून सुनिता विल्यम्स अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी करू शकणार मतदान; जाणून घ्या कसे
अमेरिकेतील राजकीय बदलांचा भारत-अमेरिका धोरणांवर दीर्घकालीन परिणाम होणार नाही- एस. जयशंकर
अमेरिकेत सुरू असलेली अध्यपदाची निवडणूक भारतासाठी महत्त्वाची आहे. भारताचे परराष्ट्र धोरण जागतिक पटलावर मजबूत करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. अमेरिका-भारत संबंधांमध्ये स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी जयशंकर यांनी विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे अमेरिकेतील राजकीय बदलांचा भारत-अमेरिका धोरणांवर दीर्घकालीन परिणाम होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जयशंकर यांनी मांडली आहे.
एस. जयशंकर यांनी क्वाडबद्दलही आशावाद व्यक्त केला
याशिवाय क्वाडबद्दलही त्यांनी आशावाद व्यक्त केला. क्वाडमध्ये अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांचा समावेश आहे आणि चीनच्या आक्रमक धोरणाला प्रत्युत्तर म्हणून हा गट तयार करण्यात आला होता. एस. जयशंकर यांनी ट्रम्प यांच्या कार्यकाळात क्वाडच्या पुनरुज्जीवनाचा दाखला देत सांगितले की, ट्रम्प अध्यक्ष असताना 2017 मध्ये क्वाडला नवे जीवन मिळाले. त्यानंतर कोविड काळातही क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांची एक दुर्मिळ बैठक 2020 मध्ये टोकियो येथे झाली. यामुळे दोन्ही पक्षांकडून पुढे होणाऱ्या अध्यक्षीय बदलांचा क्वाडवर फारसा परिणाम होणार नाही, असे एस. जयशंकर यांनी म्हटले. वोंग यांनीही आपले मत व्यक्त करताना सांगितले की, क्वाडचे महत्त्व निवडणुकांच्या निकालापलीकडे टिकवून ठेवले जाईल.