भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या JSW Motors आपल्या नवीन वाहनांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कंपनीने पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAI सोबत करार केला आहे. या करारानुसार JSW Motors Combat SUV च्या विकासासाठी वाहन चाचणी, ADAS टेक्नोलॉजी, बॅटरी व्हॅलिडेशन, सायबर सिक्युरिटी आणि होमोलोगेशन यांसारख्या क्षेत्रांत सहकार्य केले जाणार आहे. 3 डिसेंबर रोजी स्वतंत्र पॅसेंजर व्हेईकल ब्रँड म्हणून पदार्पण करण्यापूर्वी कंपनीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
वाहनांच्या चाचणी आणि सर्टिफिकेशनवर भर
JSW मोटर्स आणि एआरएआय यांच्यातील सामंजस्य करारामध्ये वाहनांच्या नियामक चाचण्या आणि सर्टिफिकेशनचा समावेश आहे. ARAI ही सेंट्रल मोटर व्हेईकल्स रुल्स अंतर्गत वाहनांची चाचणी आणि प्रमाणपत्र देणारी मान्यताप्राप्त संस्था आहे. त्यामुळे जेएसडब्ल्यूच्या भविष्यातील वाहनांना भारतातील लागू असलेल्या नियमांची पूर्तता करता येते का, याची तपासणी करण्यासाठी दोन्ही संस्था एकत्र काम करतील.
पण हा करार म्हणजे कंपनीच्या पहिल्या एसयूव्हीला सर्टिफिकेशन मिळाले आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. वाहनांच्या विकास आणि चाचणीसाठी तांत्रिक सहकार्य हा या कराराचा मुख्य उद्देश आहे.
ADAS आणि बॅटरी टेक्नोलॉजीवर विशेष लक्ष
या सहकार्यामध्ये ADAS म्हणजेच अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीमच्या विकासावर भर दिला जाणार आहे. वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सुरक्षा प्रणालींची पार्ट्स आणि संपूर्ण वाहन स्तरावर तपासणी केली जाईल. याशिवाय फंक्शनल सेफ्टी आणि सायबर सिक्युरिटीवरही काम होणार आहे. इलेक्ट्रॉनिक प्रणालींमधील संभाव्य बिघाड आणि वाहनांच्या सॉफ्टवेअरचे सेफ्टी या बाबी यात महत्त्वाच्या ठरणार आहेत.
इलेक्ट्रिफाइड वाहनांसाठी बॅटरी सिस्टीमचे इंजिनिअरिंग, विकास आणि व्हॅलिडेशन हीदेखील या करारातील महत्त्वाची क्षेत्रे आहेत. भारतीय रस्ते आणि हवामानानुसार वाहनांचे स्थानिकीकरण करण्यासाठी ARAI आपले रिसर्च आणि टेस्ट स्किल्स वापरणार आहे.
Combat SUV चे महाराष्ट्रात प्रोडक्शन
हा करार ARAI च्या कोथरूड, पुणे येथील मुख्यालयात पार पडला. जेएसडब्ल्यू मोटर्सचे सीईओ रंजन नायक आणि एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
जेएसडब्ल्यूची पहिली SUV Jetour T2 वर आधारित Combat प्लग-इन हायब्रिड असण्याची अपेक्षा आहे. या वाहनाचे प्रोडक्शन छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक प्रोजेक्टमध्ये करण्याची योजना आहे.
याशिवाय कंपनीने टाटा एलेक्सी आणि केपीआयटी टेक्नॉलॉजीजसोबतही सहकार्य केले आहे. एप्रिल 2026 मध्ये टाटा एलेक्सी आणि जेएसडब्ल्यूने पुण्यात JNEXT टेक्नोलॉजी सेंटर स्थापन करण्यासाठी करार केला होता. केपीआयटी वाहनांचे सॉफ्टवेअर आणि डिजिटल सिस्टीम्सवर काम करत आहे. विशेष म्हणजे जेएसडब्ल्यू मोटर्स ही जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियापासून स्वतंत्र कंपनी आहे. त्यामुळे 3 डिसेंबरच्या पदार्पणाकडे ऑटोमोबाईल क्षेत्राचे लक्ष लागले आहे.