शेतकऱ्यांसाठीचं कर्ज बनलं मोठं टेन्शन?
सरकारी बँकांवर कोणतं मोठं सावट?
नेमकं काय घडतंय?
Public Sector Banks Risk : भारतात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. त्यात देशातील मान्सून यावर्षीत नेहमीपेक्षा खूपच कमी राहिला आहे. कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं बरंच नुकसान झालं आहे. मात्र हा कमी पडलेला पाऊस शेतकऱ्यांसाठीच समस्येचं कारण ठरलेला नाही. तर याचा बँकांवरही वाईट परिणाम पडून गेला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या एका ताज्या अहवालात याचा तपशील देण्यात आला आहे. त्यात नेमका बँकावर याचा कसा परिणाम झाला आहे हे स्पष्ट केलं आहे.
या अहवालानुसार, कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर आणि उत्पन्नावर परिणाम झाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना त्यांच्या बँकेच्या कर्जाची परतफेड करणे कठीण होऊ शकते. याचा परिणाम २०२६-२७ या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर होऊ शकतो. तो नेमका कशाप्रकारे हे स्पष्ट केलं आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, २०२६ च्या मान्सूनमध्ये देशात सरासरीपेक्षा १३% कमी पाऊस झाला. महाराष्ट्र आणि कर्नाटक ही सर्वाधिक प्रभावित राज्ये होती. या राज्यांमधील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॅनरा बँकेवर अधिक दबाव येऊ शकतो, कारण या बँकांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिले आहे. कर्जमाफीमुळे यांच्यावरील भार वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यांच्या एकूण कर्जाचा एक मोठा हिस्सा शेतकरी आणि ग्रामीण भागांना देतात. कमी पावसामुळे पिकांचे उत्पन्न कमी होते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटते. यामुळे त्यांना कर्जाची परतफेड करणे कठीण होऊ शकते. उदाहरणार्थ, कॅनरा बँकेच्या भारतातील एकूण कर्जांपैकी २२.९% कर्ज कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अंदाजानुसार, जर महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ३५% पीक कर्जांची पुनर्रचना केली गेली, तर आर्थिक वर्ष २०२७ मध्ये काही बँकांच्या प्रति शेअर उत्पन्नावर १-४% ने परिणाम होऊ शकतो.
अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत बँकांच्या कृषी कर्जाच्या स्थितीत सुधारणा झाली आहे. कृषी क्षेत्रातील एकूण अनुत्पादक मालमत्तेचे (GNPAs) प्रमाण ९-१०% वरून सुमारे ५% पर्यंत कमी झाले आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत कृषी कर्जावरील नवीन थकबाकीचे प्रमाण १-३% च्या दरम्यान राहिले आहे. काही बँकांसाठी, लहान शेतकऱ्यांकरिता हा आकडा २% पेक्षा कमी राहिला आहे. पण, लहान शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जांमध्ये अजूनही काही प्रमाणात धोका आहे.