मागास समाजाच्या शिक्षणाचे सर्वेक्षण होणार
फुले-आंबेडकर अध्यासनाचा उपक्रम
२७ नोव्हेंबरला फुलेवाड्यातून शुभारंभ
Phule Ambedkar Adhyasan: शिक्षणाच्या ज्योतीने आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेली व्यक्ती, कुटुंब आणि पर्यायाने संपूर्ण समाज उजळून टाकण्यासाठी महात्मा जोतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्य वेचले. त्यांचे हे कार्य पुढे नेण्यासाठी या समाजाची शैक्षणिक सद्यःस्थिती नेमकी काय आहे, याचे सर्वेक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाने हाती घेतले आहे.
या उपक्रमाची सुरुवात महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता फुलेवाड्याच्या प्रांगणात होणार आहे.
पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल. सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात लोहियानगर आणि येरवडा येथील वस्तींची निवड करण्यात आली आहे. या प्रभागांतील नगरसेवक अविनाश साळवे व मृणाल कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले असून, इतर स्थानिक नगरसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी दिली.
महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांनी मागास समाजाच्या उन्नतीवर सर्वाधिक भर दिला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा दोन्ही महापुरुषांचा संदेश होता. या समाजातील किती विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे आणि त्यांच्यापुढे नेमके कोणते प्रश्न आहेत, याचा उलगडा करण्यासाठी पुण्यातील किमान दहा भागांत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांची मदत घेतली जाईल.
सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवर आधारित सविस्तर अहवाल तयार करून त्यात समस्यांवरील उपाय सुचवले जातील. या माध्यमातून शिक्षणातील गळती कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही डॉ. काळकर यांनी सांगितले.
मागास समाजाच्या शिक्षणाचे सर्वेक्षण कोणाकडून केले जाणार आहे?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन यांच्यातर्फे हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ कधी आणि कोठे होणार आहे?
महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता फुलेवाड्याच्या प्रांगणात या उपक्रमाची सुरुवात होणार आहे.
या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे?
आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास समाजाची शैक्षणिक सद्यःस्थिती जाणून घेणे आणि महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाचे कार्य पुढे नेणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.