फोटो सौजन्य - सोशल मीडिया  
Career

Teacher Authors: शिक्षकच बनले लेखक! २५ हजार शाळांच्या ग्रंथालयांसाठी तब्बल......

Teacher Authors: `समग्र शिक्षा आणि पीएम-श्री योजनेंतर्गत राज्यातील सुमारे २५ हजार शाळांच्या ग्रंथालयांसाठी शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधून १६७ पुस्तकांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

श्रेया देशमुख
  • राज्यातील २५ हजार शाळांच्या ग्रंथालयांसाठी १६७ पुस्तकांची निवड

  • ५७० पुस्तकांमधून काटेकोर छाननी

  • मराठी ११२, उर्दू २३, इंग्रजी २०, हिंदी १२ पुस्तके

सोनाजी गाढवे/नवराष्ट्र पुणे

Teacher Authors: `समग्र शिक्षा आणि पीएम-श्री योजनेंतर्गत राज्यातील सुमारे २५ हजार शाळांच्या ग्रंथालयांसाठी शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधून १६७ पुस्तकांची अंतिम निवड करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी), पुणे येथे ही निवड प्रक्रिया पार पाडली.

सन २०२४-२५ मध्ये या उपक्रमातून २३० पुस्तके आणि २४८ लेखकांनी भाग घेतला होता. सन २०२५-२६ मध्ये ३४४ पुस्तके आणि ४०० लेखक सहभागी झाले होते. सन २०२६-२७ साठी १७५ पुस्तके लिहिण्याचा मानस होता. मात्र प्रत्यक्षात भंडारा जिल्हा वगळता राज्यातील ३५ जिल्ह्यांकडून विविध स्तर आणि माध्यमांतून एकूण ५७० पुस्तके प्राप्त झाली.

दि. ८ ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान एससीईआरटी, पुणे येथे आयोजित तीन दिवसीय कार्यशाळेत राज्यस्तरीय पुस्तक निवड व संपादन समितीच्या ४७ पैकी ३५ सदस्यांनी या पुस्तकांची छाननी केली. यावेळी लेखकाचे नाव, पुस्तकाचे नाव आणि जिल्ह्याची माहिती झाकून प्रत्येक पुस्तकाला कोड नंबर देण्यात आला होता, जेणेकरून निवड प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय आणि निष्पक्ष राहील.

एकूण १६७ पुस्तकांना अंतिम मंजुरी

पुस्तकांची वयोगटनिहाय उपयुक्तता, भाषाशैली, संकल्पनात्मक स्पष्टता, शैक्षणिक मूल्य आणि व्याकरणदृष्ट्या सखोल परीक्षण करून मेरीट लिस्ट तयार करण्यात आली. उपलब्ध अनुदान आणि शाळांची संख्या लक्षात घेऊन कट-ऑफ निश्चित करण्यात आला. छाननीअंती समग्र शिक्षा आणि पीएम-श्री एकत्रित मिळून एकूण १६७ पुस्तकांना अंतिम मंजुरी देण्यात आली.

यात मराठी माध्यमाची ११२, उर्दूची २३, इंग्रजीची २० आणि हिंदीची १२ पुस्तके आहेत. ही पुस्तके इयत्ता १ ते १२ या सर्व स्तरांसाठी आहेत. कथा, कविता, सामान्य ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, छोटी चरित्रे, प्रवासवर्णने, आरोग्य व सुरक्षितता, अभ्यास सवयी, शैक्षणिक अॅप्स, गती वाचन, स्पर्धा परीक्षा, सृजनात्मक लेखन, कला-क्रीडा, एआय यांसारख्या नाविन्यपूर्ण विषयांवर ही पुस्तके आधारित आहेत.

सहसंचालकांनी दिले 'हे' निर्देश

निवड झालेल्या पुस्तकांमधील किरकोळ संपादकीय व भाषिक सुधारणा लवकरात लवकर पूर्ण करून अंतिम मसुदा छपाईसाठी द्यावा, असे निर्देश सहसंचालकांनी दिले आहेत. यासाठी दि. २६ ते ३० ऑक्टोबर २०२६ दरम्यान एससीईआरटी येथे ४७ समिती सदस्य आणि १६७ निवड झालेले लेखक यांची संयुक्त कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात लेखकांकडून हमीपत्र व करारनामा लिहून घेण्यात आला.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संचालक मंगेश जोशी यांची भूमिका

“शिक्षक केवळ ज्ञानदान करणारे नसून समाजाचे संस्कार शिल्पकार आहेत. त्यांच्या अनुभवातून साकारलेली पुस्तके राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही अभिमानाची बाब आहे. समग्र शिक्षा व पीएम-श्री अंतर्गत २५ हजार शाळांसाठी ५७० पैकी १६७ पुस्तकांची निवड केली. मराठी, उर्दू, इंग्रजी व हिंदी अशा चार भाषांतील पुस्तकांमुळे बहुभाषिक वाचन मिळेल.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार ग्रंथालये ही ज्ञान, कल्पनाशक्ती व सर्जनशीलतेची केंद्रे बनतील. यातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजेल व उद्याचे लेखक, कवी व संवेदनशील नागरिक घडतील. हा उपक्रम महाराष्ट्राच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असा विश्वास आहे.”

किती पुस्तकांमधून अंतिम किती पुस्तकांची निवड करण्यात आली?

राज्यातील ३५ जिल्ह्यांतून आलेल्या एकूण ५७० पुस्तकांमधून काटेकोर छाननी करून १६७ पुस्तकांना अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.

निवड झालेल्या १६७ पुस्तकांचे भाषानिहाय वाटप कसे आहे?

यामध्ये मराठीची ११२, उर्दूची २३, इंग्रजीची २० आणि हिंदीची १२ पुस्तके समाविष्ट आहेत.

ही पुस्तके कोणत्या योजनेअंतर्गत आणि कोणासाठी आहेत?

समग्र शिक्षा आणि पीएम-श्री योजनेंतर्गत राज्यातील सुमारे २५ हजार शाळांच्या ग्रंथालयांसाठी (इयत्ता १ ते १२ साठी) ही पुस्तके निवडण्यात आली असून ती शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लिहिली आहेत.

Retro Bikes Under 3 Lakhs In India: भारतात 3 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 6 रेट्रो बाईक्स; रॉयल एनफिल्डपासून ट्रायम्फपर्यंत पाहा ऑप्शन

'रोहित पवारांना PAने वैगरे कुणीतरी हे पत्र लिहून दिलं असेल...', अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया

Myanmar News : म्यानमारमध्ये लष्कराचे भीषण हल्ले; रखाइन आणि काया राज्यांत ४९ जणांचा मृत्यू, ९० हून अधिक जखमी

पुण्यात पिस्तूल विक्रीचा डाव उधळला! दोघांना सापळा रचून पकडले; तीन गावठी पिस्तुले जप्त

SL A vs PAK A : श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला रडवंल, आता फलंदाजांवर असणार ट्रॉफी जिंकण्याची मदार