शिक्षिका आणि शाळा संचालकाने ९ वर्षीय मुलीवर केला अमानुष अत्याचार
२४ नोव्हेंबर रोजी फूस लावून नेल्यानंतर हा प्रकार घडला
पॉक्सो गुन्ह्यात शिक्षिकेला न्यायालयीन कोठडी, तर फरार संचालकाचा शोध सुरू
शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिला शिक्षिकेनं आणि शाळेच्या संचालकाने एका नऊ वर्षाच्या मुलीसोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. आरोपी महिला शिक्षिकेनं मुलीला गोड बोलून आपल्या घरी नेलं होतं. यानंतर तिने संबंधित मुलीला शाळेच्या संचालकांच्या हवाली केलं. संचालकाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिला शिक्षिकेसह शाळेच्या संचालकाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पॉक्सो) गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी आरोपी महिला शिक्षिकेला अटक केली आहे, तर आरोपी संचालक फरार आहे. निली अनिका टुडू असं अटक केलेल्या आरोपी शिक्षिकेचं नाव आहे. पोलिसांनी तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे, तर मुख्य आरोपी असलेला शाळेचा संचालक फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळेबाहेर आणि पोलीस ठाण्यावर धाव घेत तीव्र आंदोलन केलं.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना झारखंड राज्यातील दुमका जिल्ह्यातील रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथील एका खासगी शाळेतील शिक्षिका आणि संचालकाने हा अमानुष प्रकार केला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी रामगड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, २४ नोव्हेंबर रोजी शाळेतील शिक्षिका निली अनिका टुडू हिने ९ वर्षीय विद्यार्थिनीला फूस लावून दुमका येथील सरुवा दुधानी परिसरातील आपल्या घरी नेले. सायंकाळी शिक्षिकेने याबाबतची माहिती शाळेचा संचालक आणि मुख्याध्यापक एमानुएल मुर्मू याला दिली. त्यानंतर संचालक आपली कार घेऊन तिथे आला. त्याने आपल्या कारमधून शिक्षिका आणि मुलीला घेऊन डोंगर परिसरातील आपल्या घरी घेऊन गेला.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, शिक्षिका आणि संचालक यांचे आधीपासूनच प्रेमसंबंध होते. संचालकाने चिमुरडीसमोर शिक्षिकेशी गैरवर्तन केले आणि त्यानंतर चिमुरडीलाही तसेच करण्यास सांगितले. घाबरलेल्या मुलीनं विरोध केला, मात्र तरीही आरोपीने तिच्यासोबत अमानुष कृत्य केलं. त्यानंतर शिक्षिका त्या मुलीला दुसऱ्या खोलीत घेऊन गेली.
दोन दिवसांनी मुलीने घरी सांगितला प्रकार
या भयानक प्रकारानंतर दोन दिवसांनी पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. हे ऐकून हादरलेल्या मुलीच्या वडिलांनी तत्काळ रामगड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दुसरीकडे, ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत व्यवस्थापनाविरोधात तीव्र निदर्शने केली आणि त्यानंतर रामगड पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी लावून धरली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा नोंदवत कारवाई सुरू केली. आरोपी शिक्षिका निली अनिका टुडू हिला अटक करून दुमका येथील विशेष पॉक्सो (POCSO) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली असून तिची रवानगी दुमका मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, फरार संचालक एमानुएल मुर्मू याला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
ही धक्कादायक घटना कुठे घडली आहे?
ही घटना झारखंड राज्यातील दुमका जिल्ह्यातील रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
या प्रकरणात कोणत्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे?
शिक्षिका निली अनिका टुडू आणि शाळा संचालक व मुख्याध्यापक एमानुएल मुर्मू यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या आरोपींबाबत काय कारवाई सुरू आहे?
निली अनिका टुडू हिला अटक करून न्यायालयीन कोठडीत दुमका मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे, तर फरार संचालक एमानुएल मुर्मूचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.