संग्रहित फोटो 
क्राईम

‘मोक्का’तील गुंडाची पुण्यात दहशत, हॉटेलची तोडफोड; चालकाकडे मागितली खंडणी

एका गुंडाने साथीदारांसोबत धानोरीत दहशत माजवत हॉटेलची तोडफोड केली आहे. हॉटेल चालकाला शिवीगाळ करून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ज्ञानेश्वर मोरे

पुणे : पुणे शहरात शेकडो टोळ्यांवर "मोक्का" कारवाई केल्यानंतर त्यातून गेल्या पाच वर्षात ८ गुंड जामीनावर बाहेर आले असताना यातील एका गुंडाने साथीदारांसोबत धानोरीत दहशत माजवत हॉटेलची तोडफोड केली आहे. हॉटेल चालकाला शिवीगाळ करून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या टोळक्याने व्यवस्थापकासह मालकाला मारहाण केली. याप्रकरणी आता पोलिसांनी गुंडासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सराइत गुंड रोहन अशोक गायकवाड, गणेश राठोड यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हॉटेल चालक अन्सार गफूर शेख (वय ३२, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रोहन गायकवाड याच्यावर खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, दहशत माजविणे, मारामारी, तसेच खंडणी मागणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तो विमानतळ आणि येरवडा परिसरात गुन्हेगारी करत होता. २०२२ मध्ये विमानतळ पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. मोक्का कारवाई केल्यानंतर गायकवाड आणि साथीदार येरवडा कारागृहात होते. गायकवाडने याप्रकरणात न्यायालयाकडून जामीन मिळविला. तो बाहेर आला. नंतर गायकवाड व साथीदारांनी पुन्हा धानोरीत दहशत माजविली सुरुवात केली होती.

शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गायकवाड आणि साथीदार धानोरी जकात नाका परिसरातील हॉटेल अमिरमध्ये जेवण करण्यास आले. यावेळी तेथे काही तरुण जेवण करत होते. गायकवाड आणि साथीदारांनी हॉटेलमधील ग्राहकांना शिवीगाळ करुन त्यांच्याशी भांडणे सुरू केली. हॉटेल मालक अन्सार शेख यांनी भांडणे सोडवून गायकवाड आणि साथीदारांना बाहेर जाण्यास सांगितले. गायकवाड आणि साथीदार तेथून निघून गेले.

काही वेळेनंतर गायकवाड आणि साथीदार पुन्हा हॉटेलमध्ये आले. त्यांनी हॉटेल मालक शेख यांना शिवीगाळ करुन हॉटेलमध्ये तोडफोड सुरू केली. हॉटेलचे व्यवस्थापक शरीफ शेख यांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार केला. शरीफ जखमी झाले. मालक अन्सार यांना धक्काबुक्की करुन त्यांना धमकी दिली. हॉटेल सुरू ठेवण्यासाठी दरमहा १५ हजार रुपये हप्त्याची मागणी केली. सहायक निरीक्षक सचिन धामणे तपास करत आहेत. पसार झालेल्या गायकवाड आणि साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

'हे निर्लज्जपणाचे लक्षण...', रोहित पवारांवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट: G ते ZX व्हेरिएंटमध्ये काय मिळणार? किंमत आणि फीचर्सची संपूर्ण माहिती

Indian Army Career: लष्करात कसे बनता येते लेफ्टिनेंट कर्नल? जाणून घ्या प्रमोशनचे संपूर्ण टप्पे!

वाळूमाफियांची दादागिरी! शासकीय कार्यालयात घुसून तलाठ्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला...

Defense News : डोकलामच्या पूर्वेला चीनचा नवा डाव! तोर्शा खोऱ्यात जमीन साफ केल्याचे उपग्रह फोटोंमधून उघड; भारताची चिंता वाढली