घरातून बाहेर पडलेला गणेश परतलाच नाही
दुसऱ्या दिवशी शेतात आढळला मृतदेह
आशी गावात खळबळ
माढेळी : वरोरा तालुक्यातील आशी येथे जुन्या वादातून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश प्रदीप काळे (वय २८, रा. आशी) असे मृत तरुणाचे नाव आहे. गावातीलच एका शेतात त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी गणेश नागोराव बाहुरे (३६, रा. कॉलरी वॉर्ड, वरोरा) याला ताब्यात घेतले असून, जुन्या वादातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास गणेश काळे हा शौचास जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. मात्र, बराच वेळ उलटूनही तो घरी परतला नाही. रात्रभर तो घरी न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. नातेवाइकांनी आणि कुटुंबीयांनी परिसरात त्याचा शोध घेतला, मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली.
दरम्यान, गुरुवारी सकाळी धनराज आसेकर यांच्या शेतात गणेश काळे याचा मृतदेह आढळून आला. ही माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पुढील तपासाची कार्यवाही सुरू केली. दरम्यान, आशी गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा मृत्यू घातपात आहे की अन्य काही कारणामुळे झाला, तसेच शेतीच्या कामावरून झालेल्या वादाचा या घटनेशी नेमका काय संबंध आहे, याचा उलगडा पोलिस तपासानंतरच होणार आहे.
शेतीच्या कामावरून झाला होता वाद
या घटनेमागे काही दिवसांपूर्वी झालेला वाद कारणीभूत असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. संशयित गणेश बाहुरे आणि मृत गणेश काळे यांच्यात शेतीच्या कामावर येण्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादातून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. संशयित बाहुरे याची आशी येथे शेती असल्याने त्याचे गावात येणे-जाणे होते. या पार्श्वभूमीवर जुन्या वादाचा राग मनात धरून गणेश काळे याचा मृत्यू घडवून आणला असावा, असा संशय तपासादरम्यान व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गणेश नागोराव बाहुरे याला ताब्यात घेतले असून, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील सत्य शोधण्यासाठी तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकिशोर खनके पुढील तपास करीत आहेत.
गणेश प्रदीप काळे (वय २८, रा. आशी) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह गावातील धनराज आसेकर यांच्या शेतात आढळून आला.
संशयित गणेश नागोराव बाहुरे आणि मृत गणेश काळे यांच्यात शेतीच्या कामावर येण्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच जुन्या वादातून घटना घडली असावी, असा प्राथमिक संशय आहे.
पोलिसांनी संशयित गणेश नागोराव बाहुरे (वय ३६, रा. कॉलरी वॉर्ड, वरोरा) याला ताब्यात घेतले आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील सत्य शोधण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.