सौजन्य फोटो - AI Gemini Hospital news
क्राईम

रात्री शोरमा खाल्ला अन् सकाळी थेट रुग्णालय गाठावं लागलं! भिवंडीत गर्भवती महिला व चिमुकल्यांसह १७ जणांना विषबाधा

रात्री शोरमा खाल्ला अन् सकाळी थेट रुग्णालय गाठावं लागलं! भिवंडीत गर्भवती महिला आणि चिमुकल्यांसह १७ जणांना अन्नातून विषबाधा; मनपाने टपरी जप्त करत पोलिसांत गुन्हा दाखल केला!

Sanofar Nayakawadi

खाद्यपदार्थांतील भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाची (FDA) कारवाई सुरू असतानाच भिवंडीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात पदपथावरील एका दुकानातून शोरमा खाल्ल्याने लहान मुले आणि एका गर्भवती महिलेसह तब्बल १७ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकारानंतर भिवंडी महापालिकेने तातडीने कारवाई करत संबंधित शोरमा सेंटरवर तोडक कारवाई करून टपरी जप्त केली आहे, तर निजामपुरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री शोरमा खाल्ला अन् सकाळी प्रकृती बिघडली

मिळालेल्या माहितीनुसार, वंजारपट्टी नाका परिसरातील 'ए.के. शोरमा' या पदपथावरील दुकानातून सोमवारी रात्री काही नागरिकांनी शोरमा खरेदी करून खाल्ला होता. रात्रीपासूनच अनेकांना पोटदुखी सुरू झाली, तर मंगळवारी सकाळपर्यंत मळमळ, उलट्या, जुलाब आणि तापाचा तीव्र त्रास जाणवू लागला. सुरुवातीला एकाच कुटुंबातील चार ते पाच जण उपचारासाठी भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती शासकीय रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर याच दुकानातून शोरमा खाल्लेले इतर नागरिकही त्रास होऊ लागल्याने एकामागून एक रुग्णालयात दाखल झाले.

गर्भवती महिलेसह लहान मुलांचा समावेश

विषबाधा झालेल्या १७ रुग्णांमध्ये महिला, पुरुष आणि पाच ते सहा लहान मुलांचा समावेश आहे. यामध्ये दोन महिन्यांच्या एका गर्भवती महिलेचाही समावेश असून, सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. मात्र, तिला पोटदुखीचा त्रास कायम राहिल्यास पुढील सखोल तपासणी केली जाईल, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. काही रुग्णांचा रक्तदाबही कमी झाल्याने त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

महापालिका, FDA आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

घटनेची माहिती मिळताच भिवंडी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश गोष्टेकर, बीट निरीक्षक हनुमान म्हात्रे, आरोग्य अधिकारी फैसल तातली, वैद्यकीय पथक, निजामपुरा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महापालिकेने संबंधित बेकायदा शोरमा टपरीवर कारवाई करत ती जप्त केली आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी घेण्यात आले असून, निजामपुरा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. काही महिन्यांपूर्वी मुंबईतही शोरमा खाल्ल्याने विषबाधेच्या घटना घडल्या होत्या, त्यानंतर आता भिवंडीत हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

भिवंडीत शोरमा खाल्ल्याने किती जणांना विषबाधा झाली आहे?

भिवंडीतील वंजारपट्टी नाका परिसरातील 'ए.के. शोरमा' दुकानातून शोरमा खाल्ल्याने दोन महिन्यांची गर्भवती महिला आणि लहान मुलांसह एकूण १७ जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे.

बाधित रुग्णांवर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत?

विषबाधा झालेल्या सर्व १७ रुग्णांना भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर प्रशासनाने कोणती कारवाई केली आहे?

भिवंडी महापालिकेने संबंधित बेकायदा शोरमा टपरीवर तोडक कारवाई करत ती जप्त केली आहे, एफडीएने अन्नाचे नमुने घेतले असून निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Paach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ आता घरबसल्या पाहता येणार, आला ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर

Homemade Hair Oil: हिवाळ्यात केसांना द्या भरपूर पोषण! 'या' पदार्थांचा वापर करून बनवा खास घरगुती तेल, केस होतील मऊ

Women Safety & Rights: आज महिलांविरुद्ध हिंसाचार निर्मूलन दिन; जाणून घ्या २५ नोव्हेंबरचा इतिहास...

उदगीरचे तरुण झाले देवदूत! पेटत्या एसटी बसमधून ३८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले

Airoli-Katai Highway: नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास होणार जलद; दुहेरी बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात