हॉटेलच्या खोलीत विद्यार्थिनीचा संशयास्पद मृतदेह
खोलीत सुसाईड नोट व उंदीर मारण्याचे औषध सापडले; सोबतचा तरुण फरार
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पोलिसांकडून फरार तरुणाचा शोध सुरू
Student Death: दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनीचा हॉटेलच्या खोलीत संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा तरुणीचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत बेडवर पडलेला होता आणि तिच्या नाका-तोंडातून फेस येत होता. धक्कादायक बाब म्हणजे ती ज्या तरुणासोबत हॉटेलवर आली होती, तो तरुण देखील घटनास्थळावरून फरार झाला आहे. हरियाणातील फरीदाबादमधील सराय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका OYO हॉटेलमध्ये ही खळबळजनक घटना घडली असून, अर्चना असं या मृत विद्यार्थिनीचं नाव आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी घरून निघाली होती. दुपारी सुमारे तीन वाजेपर्यंत कुटुंबीयांचे तिच्याशी फोनवर बोलणंही झालं होतं; मात्र त्यानंतर तिचा मोबाईल अचानक बंद झाला. बराच शोध घेऊनही तिचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर चिंतेत असलेल्या कुटुंबीयांनी मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) सकाळी धौज पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. ही तक्रार दाखल झाल्यानंतर काही तासांतच पोलीस नियंत्रण कक्षाला सराय परिसरातील एका हॉटेलच्या खोलीत तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा उघडला असता, अर्चना बेडवर बेशुद्ध पडली होती आणि तिच्या तोंडातून व नाकातून फेस येत होता.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना खोलीत उंदीर मारण्याचं औषध आणि एक सुसाईड नोट सापडली आहे. प्राथमिक पुराव्यांवरून तरुणीने उंदीर मारण्याचं औषध प्राशन करून जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी हॉटेलच्या रजिस्टरची तपासणी केली असता अर्चना आणि तिच्या शेजारी राहणारा विपिन यादव नावाचा तरुण यांनी सोमवारी हॉटेलमध्ये चेक-इन केल्याचं समोर आलं आहे. घटनेनंतर विपिन यादव घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी अर्चनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बीके रुग्णालयाच्या शवागारात पाठवला असून, फरार तरुणाच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या सुसाईड नोटमधील हस्ताक्षराचीही तपासणी सुरू असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं.
मृत विद्यार्थिनी कोठे शिक्षण घेत होती आणि तिचा मृतदेह कोठे आढळला?
मृत विद्यार्थिनी अर्चना (वय १९) ही दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेत होती आणि तिचा मृतदेह हरियाणातील फरीदाबादमधील सराय परिसरातील एका OYO हॉटेलच्या खोलीत आढळून आला.
हॉटेलच्या खोलीत पोलिसांना कोणते पुरावे सापडले आहेत?
पोलिसांना खोलीत उंदीर मारण्याचे औषध आणि एक सुसाईड नोट सापडली असून, विद्यार्थिनीच्या नाका-तोंडातून फेस येत होता.
विद्यार्थिनीसोबत हॉटेलवर कोण आलं होतं?
हॉटेलच्या रजिस्टरनुसार अर्चना तिच्या शेजारी राहणारा विपिन यादव नावाच्या तरुणासोबत सोमवारी हॉटेलमध्ये आली होती; घटनेनंतर तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.