बापानेच केला 6 वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून; मृतदेह फेकला कृष्णा नदीत अन्...  
क्राईम

Crime News : बापानेच केला 6 वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून; मृतदेह फेकला कृष्णा नदीत अन्...

१६ मार्च रोजी आरोपीने पत्नीला मुलाला होस्टेलला सोडायला जातो, असे सांगून सिद्धार्थला घरातून नेले. मात्र, उंब्रज परिसरात आणून त्याने निर्दयपणे मुलाला नदीत फेकून खून केला.

कृपादान आवळे

उंब्रज : वडोली भिकेश्वर (ता. कराड) येथील कृष्णा नदीत मृतावस्थेत सापडलेल्या चिमुकल्याच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला असून, जन्मदात्या बापानेच आपल्या ६ वर्षीय मुलाचा निर्दयीपणे खून केल्याचे समोर आले आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि खळबळ उडाली आहे.

सिद्धार्थ मल्लिकार्जुन आरेकेरी (वय ६) असे मृत मुलाचे नाव असून, आरोपी वडील मल्लिकार्जुन आरेकेरी (रा. नागठाण, ता. विजापूर, कर्नाटक) यानेच मुलाला कृष्णा नदीत फेकून ठार मारल्याची कबुली पोलिस तपासात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी आरोपीने पत्नीला मुलाला होस्टेलला सोडायला जातो, असे सांगून सिद्धार्थला घरातून नेले. मात्र, उंब्रज परिसरात आणून त्याने निर्दयपणे मुलाला नदीत फेकून खून केला. आरोपी यापूर्वी वडोली भिकेश्वर परिसरात वाळू उपसा कामासाठी येत असल्याने त्याला हा निर्जन भाग चांगलाच परिचित होता.

या निर्दयी कृत्यापूर्वी मुलाला नवीन कपडे घालून त्याला नदीपात्रात टाकल्याची बाब समोर आली आहे. खून करून आरोपी शांतपणे घरी परतला. दरम्यान, १ एप्रिल रोजी सिद्धार्थचा वाढदिवस असल्याने आई भाग्यश्री हिने मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क न झाल्याने संशय वाढला. वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिने पोलिसांत मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

दुसरीकडे, १८ मार्च रोजी मसूर पोलिसांना वडोली भिकेश्वर हद्दीत कृष्णा नदीत सदर मुलाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर विविध पोलीस ठाण्यांना फोटो पाठवून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू होते. याच धाग्यावरून कर्नाटक पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली आणि अखेर या हत्येचा उलगडा करण्यात यश मिळवले.

शनिवारी सायंकाळी कर्नाटक पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी आणून पंचनामा केला. त्यावेळी मसूर पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात, सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले, प्रदीप पाटील, अमोल पवार, एस. सी. लावंड यांनी तपासात मोलाचे सहकार्य केले.

दरम्यान, स्वतःच्या पोटच्या मुलाचा जीव घेण्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पुढील तपासात याचा उलगडा होणार आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Airoli-Katai Highway: नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास होणार जलद; दुहेरी बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात

भुशाच्या ढिगाऱ्याखाली सापडले सव्वा तीन कोटींचे घबाड; सशस्त्र दरोड्याचा अखेर छडा

Share Market Today: शेअर बाजारात काय घडणार? कोणते शेअर्स देणार कमाईची संधी? जाणून घ्या सविस्तर

मटारची आवक वाढली, अन्य भाज्या मात्र कडाडल्या! नवी मुंबई बाजर समितीमध्ये भाव १२० रुपये प्रति किलोवरून ५० रुपयांपर्यंत घसरला

Vastu Tips: इतरांकडून चुकूनही उधार घेऊ नका 'या' वस्तू; घराच्या सुख शांतीवर होऊ शकतो परिणाम