Pune Crime 
क्राईम

दाढीच्या बहाण्याने कात्री घेतली अन् मेहुण्याचा जीव घेतला; आरोपीला न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

बहिणीला मारहाण होत असताना मदतीला धावलेल्या २३ वर्षीय मेहुण्याचा कात्रीने वार करून खून करणाऱ्या आरोपीला विशेष न्यायालयाने जन्मठेप आणि एकूण २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Dnyaneshwar more
  • बहिणीला वाचवण्यासाठी धावलेल्या मेहुण्याचा खून

  • दाढीच्या बहाण्याने कात्री घेऊन आरोपीने केला हल्ला

  • आरोपीला जन्मठेप आणि २५ हजारांचा दंड

पुणे : बहिणीला मारहाण होत असताना मदतीला धावलेल्या २३ वर्षीय मेहुण्याचा कात्रीने वार करून खून करणाऱ्या आरोपीला विशेष न्यायालयाने जन्मठेप आणि एकूण २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सचिन सुभाष जगताप (वय ४२, रा. भूगाव, ता. मुळशी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विशेष न्यायाधीश हर्षल के. भालेराव यांनी हा निकाल दिला आहे. ही घटना २ जुलै २०२१ रोजी भूगाव (ता. मुळशी) येथे घडली होती.

या हल्ल्यात आरोपीचा मेहुणा सोमा ऊर्फ अजय मोहन मरसाळे (वय २३, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपीची पत्नी पूनम जगताप यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी आणि फिर्यादी यांचा आंतरजातीय विवाह झाला होता. सोमा कामानिमित्त भूगाव येथे बहिणीकडे राहायला आला होता. कामाच्या ठिकाणी तो उलट उत्तरे देतो आणि त्याच्याशी पटत नाही, या कारणावरून त्याला घरातून काढून टाकण्याचा तगादा आरोपीने लावला होता. घटनेदिवशी आरोपीने दारूच्या नशेत पत्नी आणि आईशी वाद घालत मेहुण्याला जिवे मारण्याची धमकी दिली.

मेहुणा घरी आल्यावर दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. थोड्या वेळाने वाद शांत झाल्यावर आरोपीने दाढी करण्याच्या बहाण्याने आईकडून कात्री घेतली आणि ती खिशात ठेवली. त्यानंतर त्याने पत्नीचे केस धरून तिला मारहाण सुरू केली. यावेळी मेहुणा आणि आई मध्यस्थीसाठी धावले असता, आरोपीने खिशातील कात्रीने मेहुण्याच्या गळ्यावर, कानाजवळ आणि छातीवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या सोमाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दाढीच्या बहाण्याने खिशात ठेवली कात्री

सरकारतर्फे विशेष सरकारी वकील भारती कदम यांनी काम पाहिले. या खटल्यात आरोपीची आई आणि पत्नी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. मृत तरुण अनुसूचित जातीतील असल्याची आरोपीला पूर्ण कल्पना होती आणि त्याने रागातून हा खून केल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. मृत सोमाने बेल्टने आरोपीचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आरोपीने आत्मरक्षणासाठी कात्रीने वार केले, असा दावा बचाव पक्षाने केला. तसेच ही घटना रागाच्या भरात घडली असून त्यामागे कोणताही पूर्वनियोजित हेतू नव्हता, त्यामुळे खुनाचा गुन्हा लागू होत नाही, असेही बचाव पक्षाकडून मांडण्यात आले. मात्र, आधीचा वाद शांत झाल्यानंतर आरोपीने आईकडून दाढीच्या बहाण्याने कात्री मागून खिशात ठेवली होती, यावरून हल्ला करण्याचा त्याचा पूर्वनियोजित हेतू स्पष्ट होतो, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने बचाव पक्षाचा आत्मरक्षणाचा दावा फेटाळून लावला. न्यायालयाने आरोपीला खुनाच्या गुन्ह्यासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये दोषी ठरवत ही शिक्षा ठोठावली आहे.

मेहुण्याचा खून करणाऱ्या आरोपीचे नाव काय आहे?

सचिन सुभाष जगताप (वय ४२, रा. भूगाव, ता. मुळशी) असे आरोपीचे नाव आहे.

ही हत्या नेमकी कधी आणि कुठे घडली?

२ जुलै २०२१ रोजी भूगाव (ता. मुळशी) येथे ही घटना घडली होती.

न्यायालयाने आरोपीला कोणती शिक्षा सुनावली?

विशेष न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि एकूण २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Youth Artistic Gymnastics : जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत शुभदा भाबरेची सुवर्णभरारी; महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद, पश्चिम बंगालचेही वर्चस्व

मध्यरात्री दीड वाजता रक्ताचा सडा! आईला त्रास देणाऱ्या सख्ख्या भावावर कुऱ्हाडीचे वार अन्...

Home tips: नवीन आठवड्याची सुरुवात करा फ्रेश मूडमध्ये! रविवारी करा 'Sunday Reset', घरासोबत स्वतःचीही घ्या काळजी

बोरांसाठी चिमुरडीवर क्रूरतेचा कळस! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची चक्रे फिरली...

जुन्या WhatsApp DP ला म्हणा बाय-बाय! AI बनवणार तुमचा नवा स्टायलिश लूक