यवतमाळ : यवतमाळ शहरात वाढलेल्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली असून, एका घरफोडीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. घरफोडीप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीतील काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या यवतमाळ पथकाने ही कारवाई केली आहे.
शाहीद शहा कलंदर शहा (वय २६, रा. लुंबिनीनगर, यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आसीफ अब्दुल हमीद शेख (वय ४४, रा. गुलशननगर, पांढरकवडा रोड, यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून अवधुतवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसीफ शेख यांचे काका अलमासनगर, पांढरकवडा रोड, यवतमाळ येथे राहतात. ते आपल्या मुलाला भेटण्यासाठी पुणे येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत आरोपीने घराची रेकी केली. त्यानंतर ९ ते १५ नोव्हेंबरदरम्यान घरफोडी करून घरातील साहित्य चोरून नेले.
या चोरीमध्ये पाण्याची मोटार तसेच घरगुती चिल्लर सामान असा मुद्देमाल चोरीस गेला होता. काका पुण्याहून परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आसीफ शेख यांनी १६ नोव्हेंबर रोजी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. तपासादरम्यान आरोपी शाहीद शहा याचा सहभाग समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून घरफोडीतील काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
घरफोडीची घटना कधी घडली?
अलमासनगर, पांढरकवडा रोड, यवतमाळ येथील घरात ९ ते १५ नोव्हेंबरदरम्यान घरफोडी झाली. घरमालकाचे कुटुंब पुण्याला गेले असताना आरोपीने घराची रेकी करून चोरी केली.
घरफोडीत काय चोरीला गेले?
घरातील पाण्याची मोटार आणि घरगुती चिल्लर सामान असा मुद्देमाल चोरीला गेला. पोलिसांनी यातील काही मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी कोणाला अटक केली?
शाहीद शहा कलंदर शहा (वय २६, रा. लुंबिनीनगर, यवतमाळ) याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.