पुणे : भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दोघे गंभीरित्या जखमी झाले आहेत. भरधाव वेगातील कार दुभाजकाला धडकल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला आदळली गेली. हा भीषण अपघात सोमवारी (दि. २३) मध्यरात्री एकच्या सुमारास वाघोली परिसरातील कटकेवाडी फाटा परिसरात घडला आहे.
अपघाताची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका येईपर्यंत पोलिस अमलदारांनी जखमींना सीपीआर देऊन जीव वाचवण्याची पराकाष्टा केली. मात्र, उपचारादरम्यान दुर्देवाने तिघा तरुणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
ओंकार अजय सूर्यवंशी (वय २४, रा. प्रभुरामनगर, वाघोली) मयूर सतीश औटी (वय २६, रा. वाघोली, मूळ रा. पारनेर, जि. अहिल्यानगर) आणि शंकर वासुदेव ढोळे (वय २२, रा. प्रभुरामनगर, वाघोली, मूळ रा. हिंगोली) यांचा मृत्यू झाला. तर आशुतोष नंदकुमार मरकड (वय २८, रा. प्रभुरामनगर, वाघोली) प्रणय भरत शिंदे (वय २४, रा. मांजरी खुर्द, ता. हवेली) हे दोघे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पाचही मित्र विविध गावचे असून पुण्यातील वाघोली परिसरात राहायला आहेत. ते खासगी नोकरी आणि व्यवसाय करीत होते. सोमवारी (दि. २३) रात्री एकच्या सुमारास कारने ते पुणे-अहिल्यानगर रस्त्याने घरी जात होते. त्यावेळी मयूर औटी हा गाडी चालवत होता. कटकेवाडी फाटा कमानीजवळ त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला धडकून पुढे रस्त्याकडील ट्रकवर (एमएच १६ बीसी ८१७४) जाऊन आदळली. त्यामुळे अपघातात कारमधील सर्वजण जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून आय मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दोघांवर उपचार सुरू आहेत. अपघातातील कार (एमएच १२ केई ४१७४) मयूर ओटी याच्या मालकीची आहे. दरम्यान, अपघातच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या २५ ते २७ वयोगटातील तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार करीत आहेत.
पोलिस अमलदारांकडून प्रयत्नांची पराकाष्टा
अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना उपचार मिळण्यापुर्वी वाघोली पोलिस ठाण्यातील अमलदारांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोच होईपर्यंत अपघातग्रस्त गाडीतील सर्वांना त्यांनी बाहेर काढले. पोलिस अमलदार वाघमारे यांच्यासह इतर अमलदारांनी जखमींना सीपीआर दिला. त्यांचा जीव वाचण्यासाठी सीपीआर देउन रुग्णालयात दाखल करेपर्यंत प्रयत्न केले. मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर उर्वरित दोघांवर उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.