नागपूर : व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला करून ३ कोटी ७४ लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीने दरोड्यानंतर मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात धाव घेतली. तेथे डोरली माल गावातील शेतात भुशाच्या ढिगाऱ्याखाली तीन पोत्यांत कोट्यवधींची रोकड लपवून ठेवली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे बालाघाटपर्यंत फिरवत ३ कोटी २८ लाख रुपये जप्त केले. या प्रकरणात चंद्रकांत बघेल आणि रजनीकांत चंद्रभान यांना अटक केली आहे. तर अन्य ६ आरोपी फरार आहेत.
शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुलसीनगर परिसरात ही सशस्त्र दरोड्याची घटना १८ नोव्हेंबरला पहाटे घडली होती. तपासात शुभम डहरवाल, अजय यादव आणि रितेश मरस्कोल्हे हे दरोड्याचे प्रमुख सूत्रधार असल्याचे समोर आले. त्यांनी 'झूम कार' अॅपच्या माध्यमातून वारंवार वाहने भाड्याने घेतली होती. दरोड्यापूर्वी चार दिवसांत तीनवेळा तुलसीनगर परिसरात जाऊन व्यापाऱ्याच्या घराची आणि वाहनाच्या हालचालींची रेकी केली. त्यानंतर गिट्टीखदान परिसरातील जगदीशनगर येथील जुनघरे आणि डहरवाल यांच्यासह अन्य साथीदारांच्या मदतीने दरोड्याचा कट प्रत्यक्षात आणला.
नातेवाईकाच्या शेतात रोकड लपवली
आरोपींनी बालाघाट जिल्ह्यातील डोरली माल गावातील दिनेश डहरवाल यांच्या शेतात लुटीतील रोकड लपवून ठेवली होती. सुमारे चार दिवसापूर्वी तीन पोत्यांमध्ये भरलेली ही रक्कम भुशाच्या ढिगाऱ्याखाली पुरली होती. पोलिसांनी आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शेतात शोधमोहीम राबवली. यावेळी भुस्याखाली लपविलेली तीन पोती आढळली. त्यामधून ३ कोटी २८ लाखांची रोकड जप्त केली. दरोड्यासाठी वापरलेले वाहनही पोलिसांनी हस्तगत केले.
46 लाख रुपये अद्याप गायब
दरोड्यात एकूण ३ कोटी ७४ लाखांची रोकड लुटली होती. त्यापैकी ३ कोटी २८ लाख रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित ४६ लाख रुपये कुठे आहेत, ते कोणाकडे ठेवले आहेत किंवा त्यांची विल्हेवाट लावली आहे का, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. फरार आरोपींच्या अटकेनंतर लुटीचे नियोजन, पैशांची विल्हेवाट आणि टोळीतील अन्य सहभागींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरोड्यात एकूण 8 आरोपींचा सहभाग
पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या माहितीनुसार, दरोड्यात एकूण ८ आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. चंद्रकांत बघेल आणि रजनीकांत चंद्रभान यांना अटक केली आहे. शुभम डहरवाल, अजय यादव, विशाल सोनगडे आणि रितेश मरस्कोल्हे यांच्यासह अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. गिट्टीखदान परिसरातील जगदीशनगर येथील जुनघरे आणि आणखी एकाच्या भूमिकेबाबतही माहिती समोर आली आहे. त्यांची नेमकी भूमिका तपासली जात आहे. गुन्हे शाखा आणि शांतीनगर पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.
दरोड्यात वापरलेली कार बालाघाट रेल्वेस्थानक परिसरात
दरोड्यानंतर आरोपी आरोपी कामठी, तुमसर आणि वाराशिवनीमार्गे मध्य प्रदेशात पसार झाले. त्यातील काही आरोपींनी बालाघाट रेल्वेस्थानकावरून अन्य साथीदारांना पुढील प्रवासासाठी सोडले. त्यानंतर ६ जण अजमेरच्या दिशेने निघून गेल्याची माहिती तपासात पुढे आली. दरोड्यात वापरलेली कार बालाघाट रेल्वेस्थानक परिसरात आढळल्याने पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा धागा मिळाला. मुख्य सूत्रधारांपैकी एका आरोपीचा नातेवाईक बालाघाटमध्ये राहत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले.