Akshay Kumar: बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या कामाचे तास आणि वर्क-लाइफ बॅलन्सचा मुद्दा अनेकदा चर्चेत येतो. एखादा मोठा अभिनेता आपल्या कामाच्या वेळापत्रकाबद्दल बोलला की या चर्चेला आणखी उधाण येते. आता अभिनेता अक्षय कुमारने आठ तासांच्या शिफ्टबाबत आपले मत मांडले आहे. त्याच्या आठ तासांच्या काम करण्याच्या सवयीमुळे अनेक मोठे निर्माते त्याला आपल्या चित्रपटात कास्ट करण्यास कचरतात, असा खुलासा त्याने केला आहे.
करण जोहरच्या लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या नवव्या सीझनमध्ये अभिनेता रवी किशनसोबत सहभागी झालेल्या अक्षयने याबाबत भाष्य केले. आपल्या कामाच्या पद्धतीचा बचाव करताना त्याने हॉलिवूड दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन आणि अभिनेता टॉम क्रूझ यांची उदाहरणेही दिली.
शोदरम्यान करण जोहरने अक्षय कुमारचे कौतुक केले. अक्षय केवळ नव्या दिग्दर्शकांना संधी देत नाही, तर निर्माता आणि दिग्दर्शकांच्या गरजांचाही विचार करतो, असे करण म्हणाला. यावर बोलताना अक्षयने आपल्या आठ तासांच्या कामाच्या वेळापत्रकाबद्दल इंडस्ट्रीमध्ये अनेक चर्चा आणि अफवा असल्याचे सांगितले.
अक्षयच्या मते, काही मोठे निर्माते त्याला त्यांच्या चित्रपटांमध्ये कास्ट करणे टाळतात. कारण तो केवळ आठ तासच काम करतो, असा त्यांचा समज आहे. मात्र, या आठ तासांमध्ये तो व्हॅनिटी व्हॅनमध्ये वेळ घालवत नाही, तर कॅमेऱ्यासमोर सातत्याने काम करतो, असेही त्याने स्पष्ट केले.
प्रेक्षकांना पडद्यावर कलाकार थकलेले नव्हे, तर ताजेतवाने आणि उत्साही दिसलेले आवडतात, असे अक्षयचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने आपल्या आयुष्यात काम, झोप, फिटनेस आणि कुटुंबासाठी वेळ निश्चित केला आहे. तो आठ तास काम करतो, आठ तास झोपतो, दोन तास फिटनेससाठी देतो आणि उरलेला वेळ कुटुंबासोबत घालवतो.
५५ दिवसांत चित्रपट पूर्ण करतो अक्षय कुमार!
यावेळी रवी किशन यांनीही अक्षय कुमारच्या कामाच्या वेगाचे आणि ऊर्जेचे कौतुक केले. अक्षय सेटवर वेगाने काम करतो आणि कमी वेळेत चित्रपट पूर्ण करून निर्मात्यांचा खर्च वाचवतो, असे रवी म्हणाले. त्यांच्या मते, अक्षय साधारणपणे ५५ दिवसांत एका चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करतो. त्यामुळे चित्रपटाचे बजेट नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच चित्रपटाशी संबंधित ३०० ते ४०० लोकांनाही सातत्याने काम मिळते.
अक्षयनेही यावेळी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लागणाऱ्या वेळेबद्दल सांगितले. अनेकजण त्याला केवळ ६५ दिवसांत चित्रपट कसा पूर्ण करतो, असा प्रश्न विचारतात. यावर उत्तर देताना त्याने हॉलिवूडमधील दोन मोठ्या नावांचा उल्लेख केला.
क्रिस्टोफर नोलन आणि टॉम क्रूझ यांची दिली उदाहरणे
अक्षयने सांगितले की, त्याने अलीकडेच दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांची एक मुलाखत वाचली. त्यामध्ये नोलन यांनी चित्रपट पूर्ण करण्यासाठी ९० दिवसांपेक्षा अधिक वेळ लागत नसल्याचे म्हटले होते. तसेच टॉम क्रूझच्या ‘मिशन: इम्पॉसिबल’ चित्रपटाचा संदर्भ देत अक्षय म्हणाला की, या चित्रपटाचे चित्रीकरण ५५ दिवसांत पूर्ण करण्यात आले होते.
अक्षय कुमारचे हे वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा बॉलिवूडमध्ये आठ तासांच्या शिफ्टचा मुद्दा चर्चेत आहे. २०२५ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ चित्रपटातून दीपिका पदुकोणने कथितरीत्या माघार घेतल्याच्या वृत्तानंतर या विषयाची चर्चा सुरू झाली होती. दीपिकाने आठ तासांच्या शिफ्टची मागणी केल्याचे वृत्त समोर आले होते.
यानंतर ‘कल्की २८९८ एडी’च्या निर्मात्यांनीही दीपिका या चित्रपटाच्या सिक्वेलचा भाग नसल्याचे जाहीर केले होते. तिच्या कामाच्या वेळा आणि नफ्यातील वाट्याबाबतही विविध चर्चा रंगल्या होत्या.
ऑक्टोबर २०२५ मध्ये सीएनबीसी-टीव्ही१८ला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीचे समर्थन केले होते. इंडस्ट्रीतील अनेक पुरुष सुपरस्टार वर्षानुवर्षे आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करत आहेत, मग आपण अशी मागणी केल्यावरच टीका का होते, असा सवाल तिने उपस्थित केला होता. केवळ महिला असल्यामुळे आपल्या मागणीकडे अतिरिक्त दबाव म्हणून पाहिले जाऊ नये, असेही तिने स्पष्ट केले होते. आलिया भट्ट, करण जोहर आणि नेहा धुपिया यांच्यासह अनेकांनी या मुद्द्यावर दीपिकाला पाठिंबा दिला होता.
अक्षय कुमारच्या वक्तव्यामुळे बॉलिवूडमधील कामाचे तास आणि कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याचा समतोल हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.