Bahirji Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या यादीत आणखी एका भव्य ऐतिहासिक चित्रपटाची भर पडणार आहे. स्वराज्याच्या शत्रूंच्या गोटात शिरून त्यांची रणनीती जाणून घेणारे, शत्रूला चकवा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमांना यश मिळवून देणारे आणि इतिहासाच्या पानांमध्ये आजही गूढ राहिलेले बहिर्जी नाईक यांची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अंश मिडिया वर्क्स निर्मित आगामी ‘बहिर्जी’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमुळे चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये एकामागोमाग एक ऐतिहासिक व्यक्तिरेखांचे चेहरे समोर येताना दिसतात. त्यांच्या नजरेतील तीक्ष्णता, चेहऱ्यावरील गंभीर भाव आणि भारदस्त लुकमधून चित्रपटाच्या रहस्यमयी विश्वाची झलक पाहायला मिळते. कोणाच्या नजरेत युद्धाचा आवेश आहे, तर कोणाच्या चेहऱ्यावर गुप्त मोहिमेची गंभीरता दिसते. या व्यक्तिरेखा नेमक्या कोणत्या असणार, त्यांच्यातील नातेसंबंध काय असणार आणि स्वराज्याच्या गुप्त मोहिमांमध्ये त्यांची भूमिका काय असेल, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचे लेखन युवराज पाटील यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या प्रवासात बहिर्जी नाईक यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शत्रूच्या गोटात जाऊन माहिती मिळवणे, शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि आपल्या बुद्धिचातुर्याने स्वराज्याच्या मोहिमा यशस्वी करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलू आजही इतिहासाच्या पडद्याआड आहेत. याच अज्ञात विश्वाचा शोध घेत बहिर्जी नाईक यांचे धाडस, बुद्धिमत्ता आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा या चित्रपटातून उलगडणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जाधव म्हणाले, “बहिर्जी नाईक यांचं व्यक्तिमत्त्व जितकं विलक्षण आहे, तितकंच त्यांचं कार्य रहस्यमय आहे. या चित्रपटासाठी आम्ही ऐतिहासिक संदर्भांचा सखोल अभ्यास केला, संशोधन केलं आणि त्या काळातील वातावरण, मोहिमा व व्यक्तिरेखांचं विश्व उभं करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. मोशन पोस्टरमधून आम्ही या विश्वातील काही चेहरे प्रेक्षकांसमोर आणले आहेत. हा केवळ एका गुप्तहेराचा प्रवास नाही, तर स्वराज्यासाठी सावलीसारखं काम करणाऱ्या असंख्य शूरवीरांच्या योगदानाचा आणि त्यांच्या निष्ठेचा प्रवास आहे. लवकरच प्रदर्शनाची तारीख प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. ‘जिकर हाय तर फिक्कर नाय’ या निर्धाराने आम्ही बहिर्जींची ही गाथा मोठ्या पडद्यावर साकारत आहोत.”
बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर वृत्तीला साजेसं या चित्रपटाच्या प्रमोशनचं स्वरूपही अनोखं असणार आहे. चित्रपटातील कलाकार, त्यांच्या भूमिका आणि इतर महत्त्वाचे तपशील सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक माहिती योग्य वेळी आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणली जाणार आहे. प्रत्येक खुलासा प्रेक्षकांसाठी एक सुखद धक्का ठरेल, असे संकेत निर्मात्यांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे ‘बहिर्जी’च्या पुढील घोषणांकडे आणि प्रदर्शनाच्या तारखेकडे आता सिनेरसिकांचे लक्ष लागले आहे.