नवी दिल्ली - न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड (Justice DY Chandrachud) हे आज देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ (Oath) घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ देतील. न्यायमूर्ती चंद्रचूड हे १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत दोन वर्षांसाठी या पदावर असतील.
न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड हे न्यायमूर्ती उदय ललित (Justice Uday Lalit) यांची जागा घेतील. न्यायमूर्ती उदय ललित यांनी ११ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांची उत्तराधिकारी (Inheritor) म्हणून शिफारस केली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड यांना जून १९९८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते आणि त्याच वर्षी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ते २९ मार्च २००० ते ३१ ऑक्टोबर २०१३ या कालावधीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड हे घटनापीठाचा भाग आहेत. त्यानंतर त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. १३ मे २०१६ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. ऐतिहासिक निकाल देणार्या अनेक घटनापीठांसह सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा ते भाग राहिले आहेत. यामध्ये अयोध्या वाद, आयपीसीच्या कलम ३७७ अंतर्गत समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी ठरवणे, आधार योजनेच्या वैधतेशी संबंधित प्रकरणे, शबरीमाला प्रकरण, भारतीय नौदलात महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी अधिकार देणे आदी निर्णयांचा समावेश आहे.