डिलिमिटेशन बिलाविरोधात विरोधकांची बैठक
मल्लिकार्जुन खर्गेंनी माध्यमांशी संवाद साधून विधेयकाविरोधात मांडले मत
सत्ता काबीज करून ती कायमस्वरूपी टिकवायची असल्याचे हे विधेयक असल्याचे व्यक्त केले मत
Mallikarjun Kharge press conference : नवी दिल्ली : डिलिमिटेशन बिलावरून राज्यात आणि केंद्रात राजकारण रंगले आहे. येत्या ३० नोव्हेंबरपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार असून यामध्ये प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चा होणार आहे. यावर पूर्व तयारी करण्यासाठी काँग्रेस पक्षाने बैठक घेतली असून यानंतर माध्यमांशी संवाद साधला. तसेच हे विधेयक लोकशाहीसाठी मोठे आव्हान ठरेल आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवर अन्याय असेल, असे मत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केले.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी माध्यमांशी संवाद साधला असून यावेळी त्यांनी एनडीए सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकमताने ठरवले आहे की, मोदी सरकारकडून आणले जाणारे घटनादुरुस्ती विधेयक लोकशाहीसाठी गंभीर धोका आहे. लोकशाही मोडून काढण्याच्या आणि सर्व सत्ता स्वतःच्या हातात केंद्रित करण्यासाठी त्यांचे ८०० जागांचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य आहे."
पुढे खर्गे म्हणाले, "यापूर्वी भाजपने निवडणुकीत अब की बार ४०० पार हा नारा देऊन ४०० जागांचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य ठेवले होते. जे आता ओलांडले गेले आहे. आता, जागांची संख्या ८५० पर्यंत वाढवून, त्यांना सत्ता काबीज करून ती कायमस्वरूपी टिकवायची आहे. मोदी सरकारला लोकशाही संपवून संपूर्ण सत्ता स्वतःच्या हातात घ्यायची आहे. पण या विधेयकामुळे सरकारने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या हितांवर अन्याय केला आहे."
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "हे विधेयक काढताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या हिताचा विचार केला गेला नाही. त्यांच्यावर अन्याय केला जातोय. संविधानात सांगितले की, अनुसूचित जाती-जमातींच्या जागा वाढवल्या पाहिजेत, पण त्यासाठी कोणतीही तरतूद नाही... लवकरच नवीन जनगणना समोर येणार आहे. त्याबद्दल काहीही सांगितले गेले नाही. जर हे (मतविभागणी) नवीन जनगणनेनुसार केली गेली, तर साहजिकच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाला त्यांच्या वाढलेल्या संख्येनुसार वाढीव जागा मिळतील, पण अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाला त्यांचे हक्क मिळू नयेत, असे भाजपला वाटते."
Political News : "... पण त्यांनी माती खाल्ली", संजय राऊतांचा राष्ट्रवादी शरद पवार गटावर निशाणा
पुढे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "ज्या निवडणूक आयोगाने १० कोटींहून अधिक लोकांची नावे मतदार यादीतून वगळली आहेत, त्याच आयोगावर मतदारसंघ पुनर्रचनेची जबाबदारी सोपवली जात आहे. हे आम्हाला मान्य नाही. ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. जर त्यांच्या नेतृत्वाखाली असे घडले, तर त्यामुळे आणखी गोंधळ निर्माण होईल..."