पुणे : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील धुसफूस चांगलीच वाढली आहे. काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना असा ‘सामना’ महाविकास आघाडीत सुरू आहे. अशातच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कोरोना काळात सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा देशात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. यामुळे त्यांना पंतप्रधान करा, असे वक्तव्य चव्हाण यांनी केले आहे.
कोरोनामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला असतांना पेट्रोल डिझेल आणि गॅसवर करवाढ करून दरवाढ केली आहे. वर्षभरात पेट्रोल 23 टक्के वाढ, डिझेल 28 घरघुती गॅसमध्ये 41 टक्के वाढ झाली असून 66 वेळा ही दरवाढ केली आहे. केंद्राच्या धोरणामुळे सातत्याने दरवाढ झाली आहे. राज्यात कर मात्र स्थिर आहे. केंद्राच्या धोरणामुळे सातत्याने दरवाढ झाली, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
भाजपाचे विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीस खोटे बोलतात, असे मी म्हणत नाही. तर आकडेवारी सांगत आहे. मी आकडे मांडले आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना काय निर्णय घेतले? हे सर्वांना माहिती आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहे. त्यामुळे त्यांना पंतप्रधान करावे, अशी सूचना चव्हाण यांनी यावेळी केली.
पंतप्रधानपदासाठी ठाकरेंचे नाव सूचवताना मात्र चव्हाण यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा विसर पडला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, कुत्रे सोडल्या सारख्या तपास यंत्रणा अंगावर का सोडायच्या? दोषी ठरल्यावर कारवाई करा, आधीच्या काळात असे होते नव्हते. एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. पण दुसऱ्या कुण्या नेत्याला प्रवेश दिला की भाजपात धुतल्या तांदळासारखे होते, आणि नंतर काय झाले?, अशी टीकाही चव्हाण यांनी भाजपावर केली.