मूळव्याधीची लक्षणे कोणती?
वारंवार होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे उद्भवणारे आजार?
रक्तस्त्राव होण्याची कारणे?
कामाच्या धावपळीमध्ये आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे शरीराकडे जास्त लक्ष दिले जात नाही. पण काहीवेळा शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो आणि संपूर्ण शरीराला हानी पोहचते. बऱ्याचदा शौचावाटे रक्त बाहेर पडणे किंवा कोणतेही कारण नसताना अचानक वजन कमी होत असेल तर दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे फार आवश्यक आहे. मूळव्याधाव्यतिरिक्त डायव्हर्टिक्युलर रोग, कोलन पॉलीप्स आणि कोलोरेक्टल कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
गंभीर आजारांमुळेही वेदनाविरहित रक्तस्त्राव होऊ शरीराची रक्ताची पातळी कमी होते आणि ॲनिमियाचा धोका वाढतो.शौचातून रक्त पडण्यामागे अनेक वेगवेगळी कारण आहेत. त्यामुळे दुर्लक्ष न करता उपचार करणे आवश्यक आहे. ही लक्षणे पचनसंस्थेच्या एखाद्या गंभीर समस्येचा भाग असू शकतात. वेळीच उपचार केल्यास गुंतागुंतीच्या समस्यांपासून सुटका मिळवता येते आणि आजारांचा धोका कमी होतो. चला तर जाणून घेऊया वेदनाविरहित रक्तस्त्रावाची कारणे, याबद्दल सविस्तर माहिती.
गुदद्वाराभोवती किंवा गुदाशयाच्या आतमध्ये असलेल्या रक्तवाहिन्यांना सूज आल्यानंतर टॉयलेट पेपरवर, कमोडमध्ये किंवा शौचाच्या पृष्ठभागावर चमकदार लाल रक्त दिसण्याची जास्त शक्यता असते. अंतर्गत मूळव्याधीमध्ये कोणत्याही वेदना न होता रक्तस्त्राव होतो आणि त्या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. डायव्हर्टिक्युलर डिसीज झाल्यानंतर मोठ्या आतड्याच्या भिंतीमध्ये लहान पिशव्यांसारखे कप्पे होतात, ज्यामधून अचानक रक्त येण्याची शक्यता असते. यामध्ये कोणत्याही वेदना न होता रक्तस्त्राव होतो.
कोलन पॉलिप्स झाल्यानंतर मोठ्या आतड्याच्या आतील भागात तयार होणाऱ्या लहान गाठींना पॉलिप्स असे म्हंटले जाते. यामुळे काहीवेळा अधून मधून रक्तस्त्राव सुद्धा होऊ शकतो. मोठ्या आतड्याच्या किंवा गुदाशयाच्या कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये वेदनाविरहित रक्तस्त्राव होण्यास सुरुवात होते. कोणतीही वेदना किंवा आजारी असल्याची भावना सुद्धा जाणवत नाही.
सतत होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे वाढतो ॲनिमियाचा धोका शरीरातून वारंवार होणाऱ्या रक्तस्रावाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. ॲनिमियामध्ये शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेल्या निरोगी लाल रक्तपेशींचा पुरवठा कमी होऊन जातो. यामुळे शरीरात सतत थकवा जाणवणे, चक्कर येणे, अशक्तपणा वाटणे आणि धाप लागणे यांसारखी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात.