Tomato Pithla Recipe: पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत टोमॅटोच पिठलं, नोट करा भन्नाट चवीची रेसिपी
Tomato Pithla Recipe: जेवणाच्या ताटात प्रत्येकाला काहींना काही टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. भाजी, आमटी किंवा उसळ खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त ईच्छा होते. अशावेळी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत झणझणीत टोमॅटोच पिठलं बनवून खाऊ शकता. प्रत्येक घरात पिठलं भाकरी हा पदार्थ अतिशय आवडीने बनवून खाल्ला जातो. महाराष्ट्राच्या पारंपरिक पदार्थांमधील पिठलं भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अतिशय सुंदर लागते. बेसन, टोमॅटोची आंबटसर प्युरी, लसूण, लाल मिरच्या आणि खमंग फोडणी देऊन बनवलेले पिठलं सगळेच खूप आवडीने खातील. कामाच्या धावपळीमध्ये झणझणीत, मसालेदार पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही, अशावेळी झणझणीत टोमॅटोच पिठलं बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात लगेच तयार होतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी. (फोटो सौजन्य – pinterest)
साहित्य:
- तेल
- जिरे
- मोहरी
- हिंग
- कढीपत्ता
- कांदा
- पिकलेल्या लाल मिरच्या
- लसूण पाकळ्या
- मीठ
- बेसन
- टोमॅटो प्युरी
- गरम पाणी
- कोथिंबीर
कृती:
- टोमॅटो पिठलं बनवण्यासाठी, कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि बारीक चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
- त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात खलबत्त्यात बारीक कुटून घेतलेल्या लाल मिरच्या, भरपूर लसूण घालून व्यवस्थित मिक्स करा.
- परतलेल्या कांद्यामध्ये २ ते ३ चमचा बेसन घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
- भाजून घेतलेल्या बेसनमध्ये टोमॅटोची प्युरी घालून गुठळ्या होता चमच्याने मिक्स करा.
- त्यानंतर त्यात गरम पाणी घालून झाकण ठेवा आणि १५ ते २० मिनिटं मंद आचेवर वाफवून घ्या.
- सगळ्यात शेवटी शिजवून घेतलेल्या पिठल्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले टोमॅटो पिठलं.