वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी
Soup Recipe: बदलत्या ऋतूंमध्ये निरोगी राहण्यासाठी आहारात बदल करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. दिवसा ऊन आणि रात्री वाजणाऱ्या थंडीमुळे शरीराला हानि पोहचण्याची जास्त शक्यता असते. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप आणि इतर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात उष्ण आणि शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर भोपळ्याचे सूप पिणे हा उत्तम पर्याय आहे. भोपळ्याचे सूप प्यायल्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. लाल भोपळ्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. भोपळ्यामध्ये असलेल्या विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया भोपळ्याचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
साहित्य:
- भोपळा
- गाजर
- कांदा
- लसूण
- ऑलिव्ह तेल
- पप्रिका
- ओरेगॅनो
- चिली फ्लेक्स
- मीठ
- काळीमिरी पावडर
- नारळाचे दूध
- ब्रॉथ
कृती:
- भोपळ्याचे सूप बनवण्यासाठी भोपळा, गाजरचे मध्यम आकारात तुकडे करा.
- त्यानंतर लसूण पाकळ्या सोलून घ्या. भांड्यात कापून घेतलेला भोपळा, गाजरचे तुकडे, कांदा आणि लसूण घालून त्यात आवश्कतेनुसार पाणी, ऑलिव्ह तेल घालून सर्व साहित्य शिजवा.
- भाज्या पूर्णपणे मऊ शिजवून घेतल्यास सहज मॅश होतील.
- शिजवून घेतलेल्या भाज्या थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. भाज्यांची तयार केलेली पेस्ट टोपात घेऊन त्यात आवश्कतेनुसार पाणी घाला.
- त्यानंतर त्यात नारळाचे दूध, प्रिका, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, मीठ आणि काळीमिरी पावडर घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा.
- तयार केलेल्या सूपमध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
- सगळ्यात शेवटी सूपमध्ये ग्रिल्ड चीज घालून खाण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले भोपळ्याचे सूप.