धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्याची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे येथील कोसा रेशीम उद्योग. जिल्ह्यात तयार होणाऱ्या कोसा रेशमाच्या साड्यांना देशभरातून मागणी असून या उद्योगातून अनेक शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबांना रोजगार मिळतो. मात्र, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीने या पारंपरिक व्यवसायालाही विळखा घातला आहे. पावसाअभावी भूजल पातळी खालावल्याने टसर रेशीम अळ्यांच्या संगोपनासाठी आवश्यक असलेल्या वृक्षांची वाढ खुंटली आहे. दुसरीकडे, पाण्याअभावी तुतीच्या बागा सुकू लागल्याने अळ्यांच्या खाद्याची उपलब्धता घटली आहे. या नैसर्गिक संकटाचा टसर उद्योगावर ६० टक्क्यांपर्यंत परिणाम झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
कोसा रेशमीने मिळविली देशपातळीवर ओळख:
भंडारा जिल्हा प्रामुख्याने भात उत्पादनासाठी प्रसिद्ध असला, तरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून येथे टसर आणि तुती रेशीम उद्योगही विकसित झाला आहे. या उद्योगातून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. भंडाऱ्यातील कोसा रेशमापासून तयार होणाऱ्या साड्या आणि वस्त्रांना नैसर्गिक चमक, वैशिष्ट्यपूर्ण पोत आणि पारंपरिक विणकामामुळे विशेष मागणी असते. या साड्यांनी जिल्ह्याच्या पारंपरिक हस्तकलेला देशपातळीवर स्वतंत्र स्थान मिळवून दिले आहे. भंडाऱ्याच्या कोसा साडीची ख्याती राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळातही पोहोचली आहे. खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनाही या साडीने भुरळ घातली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना भंडाऱ्याची खास कोसा साडी भेट दिलीहोती. या घटनेतून जिल्ह्यातील रेशीम उद्योगाचे वैशिष्ट्य आणि त्याला लाभलेली व्यापक ओळख अधोरेखित होते.
अल-निनोच्या प्रभावासह पावसाच्या खंडाचा फटका:
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जिल्ह्यातील शेती आणि बागायती क्षेत्रावर परिणाम झाला आहे. अल-निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामान परिस्थितीची झळ रेशीम उद्योगालाही बसत असल्याचे चित्र आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाला असून भूजल पातळीतही घट झाली आहे. परिणामी, टसर रेशीम अळ्यांच्या संगोपनासाठी आवश्यक असलेल्या वृक्षांची वाढ खुंटली आहे. या वृक्षांच्या पानांवर टसर अळ्यांचे संगोपन अवलंबून असते. मात्र, झाडांनाच पुरेसे पाणी मिळत नसल्याने पानांची वाढ आणि उपलब्धता दोन्ही प्रभावित झाली आहेत.
तुतीच्या बागांचे अस्तित्वच धोक्यात:
टसर रेशीम उद्योगाप्रमाणेच तुती रेशीम उद्योगालाही दुष्काळाचा फटका बसत आहे. तुतीची पाने हे रेशीम अळ्यांचे प्रमुख खाद्य असल्याने बागांची जोमदार वाढ आणि नियमित पाणीपुरवठा अत्यावश्यक असतो. मात्र, यंदा पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने अनेक ठिकाणी तुतीच्या बागा सुकू लागल्या आहेत.
गारव्यानेही उत्पादनावर परिणाम
दुष्काळी परिस्थितीबरोबरच अचानक वाढलेल्या गारव्याचाही रेशीम अळ्यांवर विपरित परिणाम झाल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. अळ्यांनी पुरेसा पाला खाल्ल्यानंतरही अपेक्षेप्रमाणे कोष तयार झाले नाहीत. त्यामुळे पाण्याची कमतरता, खाद्याची अनुपलब्धता आणि हवामानातील बदल अशा तिहेरी संकटाचा सामना उत्पादकांना करावा लागत आहे. तुतीची बाग एकदा पूर्णपणे वाळली, तर ती पुन्हा उत्पादनक्षम करण्यासाठी साधारण आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो.