कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाला गती
प्रकल्प कार्यालय, संमती नोंदणी केंद्र आणि नमुना सदनिकेचे उद्घाटन
प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल
Mumbai/ kamathipura: कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळाली असून, प्रकल्पाच्या दृष्टीने आज एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला. प्रकल्प कार्यालय आणि संमती नोंदणी केंद्राचे उद्घाटन खासदार मिलिंद देवरा, अरविंद सावंत, आमदार अमीन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
याचबरोबर प्रकल्पातील रहिवासी, भाडेकरू (Mhada) आणि लाभार्थ्यांना भविष्यात उपलब्ध होणाऱ्या सदनिकांचे स्वरूप प्रत्यक्ष पाहता यावे, यासाठी उभारण्यात आलेल्या नमुना सदनिकेचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधांमुळे प्रकल्पाशी संबंधित नागरिकांना नोंदणी, माहिती आणि पुनर्वसन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
कामाठीपुरा गल्ली क्र. १ येथील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास खासदार श्री. अरविंद सावंत, खासदार मिलिंद देवरा, आमदार अमीन पटेल, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य अभियंता अनिल अंकलगी, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, मंडळाचे सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, विकासक अमृत गोयल, नगरसेविका नसीमा जुनेजा यांच्यासह कामाठीपुरा विकास समितीचे पदाधिकारी, स्थानिक रहिवासी, भाडेकरू, जमीनमालक आणि विविध घटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमारे ३४ एकर क्षेत्रावर प्रस्तावित असलेल्या कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या कक्षेत सुमारे ९४३ सेस आणि ३४९ नॉन-सेस इमारतींचा समावेश आहे. या प्रकल्पाशी ८,००० हून अधिक रहिवासी व भाडेकरू संबंधित असून, त्यामध्ये सुमारे ६,६२५ निवासी आणि १,३७६ व्यावसायिक भाडेकरूंचा समावेश आहे. याशिवाय सुमारे ८०० जमीनमालक या प्रकल्पाशी निगडित आहेत. पुनर्विकासाच्या माध्यमातून विद्यमान रहिवासी व भाडेकरूंचे नियोजित पुनर्वसन करण्याबरोबरच सुमारे ४,५०० अतिरिक्त गृहनिर्माण सदनिकांची निर्मिती करण्याचे नियोजन आहे.
हा प्रकल्प म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ (DCPR 2034) मधील विनियम ३३(९) अंतर्गत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी म्हाडाला नोडल एजन्सी तसेच विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) म्हणून दर्जा देण्यात आला आहे. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष विकासाची अंमलबजावणी Construction & Development Agency (C&DA) मार्फत करण्यात येणार आहे.
याप्रसंगी खासदार मिलिंद देवरा म्हणाले की, दक्षिण मुंबईतील प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ८००० भाडेकरू/ रहिवासी यांचे ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाच्या पुनर्वसन सदनिकेत विनामूल्य पुनर्वसन होणार आहे. सदर प्रकल्प यशस्वी व्हावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आपण सर्व प्रयत्नशील आहोत.
कामाठीपुराचं चुकीचं चित्रण केल्याने 'गंगुबाई काठियावाडी' वाद्याच्या भोव-यात
प्रकल्पाबाबत सर्व शंकांचे समाधान झाले असून प्रकल्प यशस्वी करण्यासाठी येथील भाडेकरू, रहिवासी यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन मिलिंद देवरा यांनी केले. कामाठीपुरा समूह पुनर्विकास हा केवळ जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प नसून, या ऐतिहासिक परिसराचे सर्वांगीण परिवर्तन घडवून आणण्याचा व्यापक प्रयत्न आहे. अनेक दशकांपासून या परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सुरक्षित, सुसज्ज आणि दर्जेदार निवासव्यवस्था उपलब्ध करून देतानाच परिसरातील पायाभूत सुविधा, सार्वजनिक जागा, वाहतूक व्यवस्था आणि पर्यावरणीय गुणवत्ता सुधारणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून कामाठीपुराचा विकास अधिक नियोजित, समावेशक आणि शाश्वत पद्धतीने करण्याचा म्हाडाचा प्रयत्न असल्याचे देवरा यांनी सांगितले.
खासदार अरविंद सावंत म्हणाले की, कामाठीपुरातील भाडेकरू रहिवाशांचे स्वप्नवत घर साकारण्याची मुहूर्तमेढ आज प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन करून झाली आहे. येथील रहिवाशांचे स्वप्न साकारण्यासाठी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण म्हाडाची टीम अहोरात्र मेहनत घेत आहे. संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात यावा, असे श्री. अरविंद सावंत यांनी सांगितले.
आमदार अमीन पटेल म्हणाले की, कामाठीपुरातील भाडेकरू/रहिवासी, जमीन मालक यांनी लवकरात लवकर संमतीपत्र देऊन प्रकल्पाला सहकार्य करावे. कामाठीपुरा विकास समिती व भाडेकरू/रहिवासी यांच्या एकमतामुळे हा प्रकल्प मार्गी लागला असून म्हाडा या प्रकल्पाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळेल व पुनर्वसन सदनिकांचे काम पूर्ण करेल असा विश्वास असल्याचे श्री. अमीन पटेल यांनी सांगितले.
यावेळी 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी लाभार्थी रहिवाशांशी संवाद साधताना सांगितले की, “कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाला गती देण्यासाठी येथील भाडेकरू/रहिवासी व जमीन मालकांची ५१ टक्के संमती आवश्यक आहे. येत्या ७ डिसेंबर, २०२६ पर्यंत जास्तीत जास्त भाडेकरू/ रहिवासी व पात्र जमीन मालकांनी या प्रकल्पाला संमती देऊन आपल्या स्वप्नवत हक्काच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकावे व सहकार्य करावे. प्रकल्पासाठी भाडेकरू/ रहिवासी व जमीन मालकांची संमती मिळाल्यानंतर प्रकल्पाचा बृहत आराखडा मंजूर करणे, पर्यावरण विभागाच्या परवानग्या मिळवणे, उच्चाधिकार समितीची व नगर विकास विभागाची परवानगी मिळवणे आदी पुढील बाबी तात्काळ केल्या जातील. दि. ७ डिसेंबरपर्यंत ५१ टक्के भाडेकरू, रहिवासी व जमीन मालकांची संमती मिळाल्यानंतर प्रकल्पाला पुढील सर्व परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया जानेवारी- २०२७ अखेरपर्यंत पूर्ण करून फेब्रुवारी - २०२७ मध्ये प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचा मानस असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. प्रकल्पाबाबत सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार 'म्हाडा'तर्फे करण्यात आला असून भाडेकरू/ रहिवासी यांच्यासाठी प्रकल्प कार्यालयाच्या ठिकाणी नमुना सदनिका देखील तयार करण्यात आली आहे. सदर नमुना सदनिकेमुळे भाडेकरू /रहिवासी यांना मिळणाऱ्या ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाच्या पुनर्वसन सदनिकेबाबत अंदाज येणार आहे.
कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या दृष्टीने कोणता महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला?
कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पांतर्गत प्रकल्प कार्यालय आणि संमती नोंदणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पातील नमुना सदनिकेचा रहिवाशांना काय फायदा होणार आहे?
नमुना सदनिकेमुळे प्रकल्पातील रहिवासी, भाडेकरू आणि लाभार्थ्यांना पुनर्वसनानंतर उपलब्ध होणाऱ्या घरांचे स्वरूप प्रत्यक्ष पाहता येणार आहे.