Special Marriage Act (फोटो- ai gemini) 
महाराष्ट्र

Marriage: सात फेरे की कोर्ट मॅरेज? पुण्यातील जोडप्यांचा कल बदलला, विवाह नोंदणीच्या आकडेवारीत मोठा बदल

Marriage: कार्यालयीन नोंदीनुसार, २०२५ मध्ये (१ जानेवारी ते ३१ डिसेंबर) विशेष विवाह कायद्यांतर्गत एकूण ३ हजार १९९ जोडप्यांनी विवाह केला.

तेजस भागवत
  • अंतर्गत कायदेशीर विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या लक्षणीय

  • विवाहाच्या पद्धती आणि सामाजिक मानसिकतेतही मोठा बदल

  • विवाह अधिकाऱ्याकडे किमान ३० दिवस आधी नोटीस देणे आवश्यक

जया शर्मा/Marriage: बदलत्या काळानुसार विवाहाच्या पद्धती आणि सामाजिक मानसिकतेतही मोठा बदल होताना दिसत आहे. सध्या प्रेमविवाहाला कुटुंबांकडूनही खुलेपणाने स्वीकारले जात असून, त्याचा थेट परिणाम सरकारी विवाह नोंदणी कार्यालयातील आकडेवारीवर दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने विवाह नोंदणी करणाऱ्या दाम्पत्यांच्या तुलनेत थेट 'विशेष विवाह कायदा' अंतर्गत कायदेशीर विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या लक्षणीय वाढत आहे.

जिल्हा विवाह कार्यालयाकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०२५ आणि २०२६ या दोन्ही वर्षांत विशेष विवाह कायद्यांतर्गत झालेल्या विवाहांनी 'फॉर्म १६' अंतर्गत होणाऱ्या नोंदणीला मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. यावरून आधुनिक काळातील तरुण मोठा खर्च आणि अवडंबर टाळून थेट कायदेशीर प्रक्रियेद्वारे विवाह करण्याला प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होते.

Destination Wedding places: डेस्टिनेशन वेडिंग करू पाहताय? जाणून घेऊया 'या' पर्यटनस्थळांची माहिती

दोन वर्षांची आकडेवारी काय सांगते?

कार्यालयीन नोंदीनुसार, २०२५ मध्ये (१ जानेवारी ते ३१ डिसेंबर) विशेष विवाह कायद्यांतर्गत एकूण ३ हजार १९९ जोडप्यांनी विवाह केला. याच कालावधीत यापूर्वी पारंपरिक पद्धतीने झालेल्या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळविण्यासाठी 'फॉर्म १६' अंतर्गत केवळ २ हजार २० विवाहांची नोंदणी झाली. दोन्ही प्रकारांमध्ये तब्बल २ हजार १७९ विवाहांची तफावत होती. हाच कल २०२६ मध्येही कायम आहे.

१ जानेवारी ते २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विशेष विवाह कायद्यांतर्गत ३ हजार ८४ विवाह झाले असून, याच कालावधीत फॉर्म १६ अंतर्गत २ हजार २०२ दाम्पत्यांनी विवाहाची नोंदणी केली आहे.यंदाही दोन्ही प्रकारांमध्ये १ हजार ८८२ नोंदींचा फरक आहे. २०२६ ची आकडेवारी २४ नोव्हेंबरपर्यंतची असल्याने वर्षअखेरीपर्यंत या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Mauritania Culture: घटस्फोटित महिलांसाठी भरतो ‘बाजार’? या देशात स्थूल महिलांना मानले जाते सुंदर; विवाहपरंपरा जाणून अजून व्हाल थक्क

"आम्ही दोघेही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलो आहोत; मात्र आमच्या कुटुंबांनी आमच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला. भव्य समारंभात लाखो रुपये खर्च करण्याऐवजी आम्ही विशेष विवाह कायद्यांतर्गत साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय घेतला. हा विवाह कायदेशीरदृष्ट्याही पूर्णपणे सुरक्षित आणि सन्मानजनक आहे."

- रोहित आणि स्नेहा जाधव, नवविवाहित दाम्पत्य, पुणे

विशेष विवाह कायदा, फॉर्म १६ मध्ये फरक

अनेकदा या दोन्ही प्रक्रियांना एकच समजले जाते. मात्र, कायदेशीरदृष्ट्या त्याचा उद्देश आणि प्रक्रिया वेगवेगळी आहे. विशेष विवाह कायदा, १९५४ हा कोणत्याही धार्मिक क्रिया पार पाडल्याशिवाय थेट विवाह अधिकाऱ्याच्या उपस्थितीत विवाह करण्याची सुविधा देतो. यामध्ये प्रामुख्याने आंतरजातीय तसेच आंतरधर्मीय प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या अधिक असते.

महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार, विवाह अधिकाऱ्याकडे किमान ३० दिवस आधी नोटीस देणे आवश्यक असते. या कालावधीत कोणतीही कायदेशीर हरकत न आल्यास विवाह अधिकाऱ्याच्या उपस्थितीत विवाह केला जातो. फॉर्म १६ अंतर्गत प्रक्रिया ही आधीच धार्मिक किंवा पारंपरिक पद्धतीने विवाह झालेल्या दाम्पत्यांसाठी आहे. या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळविण्यासाठी नंतर विवाह नोंदणी केली जाते. यासाठीही अर्ज आणि हरकतीसाठी निर्धारित कालावधीचे पालन करणे आवश्यक असते.

विशेष विवाह कायदा म्हणजे काय?

विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत वेगवेगळ्या धर्मांच्या किंवा एकाच धर्मातील जोडप्यांना धार्मिक विधींशिवाय कायदेशीर पद्धतीने विवाह करता येतो. यासाठी विवाह नोंदणी अधिकाऱ्यांकडे आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

पुणे जिल्ह्यात विशेष विवाह कायद्याअंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या का वाढत आहे?

बदलती सामाजिक मानसिकता, प्रेमविवाहाला कुटुंबांकडून मिळणारा वाढता स्वीकार आणि धार्मिक विधींपेक्षा कायदेशीर पद्धतीने विवाह करण्याकडे वाढलेला कल यामुळे विशेष विवाह कायद्याअंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढताना दिसत आहे

Sugarcane Farmers PIL : ऊसदरात कारखान्यांची मनमानी? ऊस नियंत्रण मंडळाच्या स्थापनेसाठी जनहित याचिका

Wedding Rituals: नवरीच्या पाठवणीवेळी तांदूळ फेकण्याची प्रथा का आहे? जाणून घ्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

Teacher Awards 2026: १२३ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; कधी आणि कुठे होणार वितरण?

Shreyas Iyer: सूर्या भाऊच्या टीममध्ये 'सरपंचा'ची एन्ट्री! श्रेयस अय्यर मुंबईच्या ताफ्यात दाखल; SKY सांभाळणार संघाची कमान

"लोकशाही संपवून सत्ता कायम राखण्याचा भाजपचा डाव...", मल्लिकार्जुन खर्गेंचा गंभीर आरोप