'अतिक्रमणांवरील कारवाई थांबणार नाही, अधिकाऱ्यांनी हात आखडता घेतल्यास...'; महापालिका आयुक्तांची कडक भूमिका कायम 
पुणे

'अतिक्रमणांवरील कारवाई थांबणार नाही, अधिकाऱ्यांनी हात आखडता घेतल्यास...'; महापालिका आयुक्तांची कडक भूमिका कायम

आयुक्त नवल किशोर राम यांनी माध्यमांशी संवाद साधताना कारवाईबाबतची प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, शहरात सुरू असलेल्या कारवाईचा परिणाम दिसू लागला आहे. फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणे हटविल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना मोकळीक मिळाली आहे.

Krupadan Awale

पुणे : शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि बेकायदा फ्लेक्सविरोधातील कारवाई कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. कारवाईमध्ये चढ-उतार होऊ शकतात; मात्र यापुढे तिचा वेग आणखी वाढवण्यात येईल. ज्या ठिकाणी अधिकारी कारवाई करण्यास कचरतील, त्या ठिकाणी मी स्वतः कारवाईसाठी उतरणार आहे, असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला. त्यामुळे राजकीय दबाव किंवा अन्य हस्तक्षेपामुळे कारवाई थांबण्याची शक्यता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आयुक्तांनी शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि फ्लेक्सबाजीविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर महापालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. रस्ते, पदपथ, इमारतींचे फ्रंट मार्जिन आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटवण्यावर भर दिला जात आहे. या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत असतानाच अनधिकृत फ्लेक्सविरोधातील पुणे महापालिकेच्या विशेष मोहिमेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली आहे. त्यांनी महापालिका प्रशासनाचे कौतुक करत नागपूर महापालिकेलाही मोहिमेचा आदर्श घेण्याचे आवाहन केले होते.

या पार्श्वभूमीवर आयुक्त नवल किशोर राम यांनी माध्यमांशी संवाद साधताना कारवाईबाबतची प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, शहरात सुरू असलेल्या कारवाईचा परिणाम दिसू लागला आहे. फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणे हटविल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना मोकळीक मिळाली आहे. मात्र, आतापर्यंत झालेली कारवाई माझ्या दृष्टीने पुरेशी नाही. कारवाईचा व्याप आणि वेग दोन्ही वाढवण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.

अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये

काही ठिकाणी व्यावसायिक स्वत:हून अतिक्रमणे काढून घेत असल्याचे दिसते. मात्र, त्यानंतरही त्या जागांवर व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा ठिकाणीही कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई करावी. जिथे अधिकारी कारवाई करण्यास कचरतील, तिथे मी स्वतः पुढाकार घेईन, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. आयुक्तांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अतिक्रमणधारक, अनधिकृत बांधकाम व्यावसायिक आणि फ्लेक्स लावणाऱ्याऱ्यांचे चाबे दणाणण्याची शक्यता आहे.

FAQ

1. पुणे महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई थांबणार आहे का?
नाही. अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि बेकायदा फ्लेक्सविरोधातील कारवाई कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, अशी भूमिका महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतली आहे.

2. कारवाईचा वेग पुढे कसा असेल?
कारवाईमध्ये चढ-उतार होऊ शकतात; मात्र यापुढे कारवाईचा वेग आणखी वाढवण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

3. अधिकारी कारवाई करण्यास कचरल्यास काय होणार?
ज्या ठिकाणी अधिकारी कारवाई करण्यास कचरतील, त्या ठिकाणी आयुक्त स्वतः कारवाईसाठी उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Gold Price Outlook : सोनं 1 लाखांच्या खाली येणार? एक्सपर्टनी थेट सांगितलं; पुढील 6 महिन्यांत 'या' रेंजमध्ये राहणार भाव

‘३,९०० रुपये पहिली उचल द्या, अन्यथा...’; देवदत्त निकम यांचा भीमाशंकर कारखाना प्रशासनाला इशारा

Ramayana OTT Release: थिएटरनंतर ‘रामायण’ ओटीटीवर कधी पाहता येणार? नमित मल्होत्रांनी सांगितली रिलीजबाबत महत्त्वाची माहिती

Mahindra Vision S SUV 2027 मध्ये होणार लाँच! स्कॉर्पिओ एनसारखा लूक आणि खास फीचर्सची झलक

IND vs NZ: शतक हुकलं, पण इतिहास रचला! टीम इंडियासाठी संकटमोचक ठरला Dhruv Jurel; धोनी-मोरे यांच्या क्लबमध्ये एन्ट्री